मागील खरीप हंगामात जिल्ह्य़ात ज्या गावांची पसेवारी कमी आली आहे, अशा गावांसाठी राज्य सरकारने १८३ कोटींचे अनुदान दिले असून ते जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन हे अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना हे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेमार्फतच देण्यात येणार असल्याने ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही, त्यांनी ते तत्काळ काढून घेण्याचे आवाहन केले आहे. हे अनुदान कापसाव्यतिरिक्त अन्य कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या आणि ३३ टक्क्य़ांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच वितरित केले जाणार आहे.
डॉ. नारनवरे म्हणाले की, जिल्ह्यास प्राप्त झालेले १८३ कोटी ८५ लाख रुपये तालुकापातळीवर वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यासाठी ३९ कोटी ७९ लाख ९३ हजार ६६५ रुपये, तुळजापूर ३२ कोटी १६ लाख ४९ हजार ५७०, उमरगा ३० कोटी ६१ लाख ३९ हजार ७४० रुपये, लोहारा ११ कोटी ३१ लाख ४३ हजार १४०, भूम १४ कोटी ७५ लाख ८० हजार १५०, परांडा १४ कोटी ९९ लाख १७ हजार ६०, कळंब २६ कोटी ६० लाख ६९ हजार ६१० रुपये, वाशी १३ कोटी ६० लाख ७ हजार ६५ रुपये असे अनुदान वितरित करण्यात आले.
क्षेत्रीय स्तरावरील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यामार्फत ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची बठक घेण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या. अल्पभूधारक, बहुभूधारक शेतकऱ्यांना कमाल प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे २ हेक्टपर्यंत हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

Story img Loader