छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील जुने कासवन गावात एकतर्फी प्रेमातून चार वर्षांपूर्वी घरात घुसून एकाच कुटुंबातील आई, वडील व १० वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी अक्षय प्रकाश जाधव (२७, रा. माळवाडी, ता. पैठण) याला तिहेरी जन्मठेपेसह एकूण ४० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एम. जमादार यांनी गुरुवारी सुनावली. आरोपीच्या दंडाची रक्कम मृतांच्या वारस मुलाला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (३५), त्यांची पत्नी अश्विनी (३०) व मुलगी सायली (१०) अशी मृतांची नावे आहेत. तर राजूचा मुलगा सोहम (६) हा या घटनेत जखमी झाला होता. मृत संभाजी यांच्या पुतणीवर आरोपी एकतर्फी प्रेम करीत होता. याबाबतची माहिती संभाजी यांना मिळाली होती. त्यामुळे आरोपी अक्षय जाधव व त्याच्या कुटुंबीयांना गाव सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जावे लागले होते. यादरम्यान आरोपीचा भाऊ हा अचानक घरातून बेपत्ता झाला होता. यामागे संभाजी यांचा हात असल्याचा संशय अक्षयला होता. यादरम्यान २९ ऑगस्ट २०१९ रोजी मृताच्या पुतणीने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय जाधव याच्याविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी या गुन्ह्यात जामिनावर असताना २७ नोव्हेंबर २०२० रोजी मृताच्या पुतणीचा पाठलाग केला होता. यावरून मृत संभाजी व आरोपी अक्षय जाधव यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने त्याला तुला आता सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्याच रात्री अक्षयने संभाजी, त्यांची पत्नी व दहा वर्षांच्या मुलीचा निर्घृणपणे खून केला होता. तर सोहम हा मुलगा बचावला. या प्रकरणात मृत संभाजी नेवारे यांचे भाऊ उर्फ पांडुरंग निवारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ आणि मधुकर आहेर यांनी २६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. ॲड. शिरसाठ यांना ॲड. तेजस्विनी मोने आणि ॲड. दिलीप खंडागळे यांनी सहाय्य केले तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार गुणावत यांनी काम पाहिले.