छत्रपती संभाजीनगर – अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेली वाळू वाहतुकीतील वाहने सोडण्यासाठी पैठणचा तहसीलदार, महसूल सहायक व एक खासगी व्यक्ती एक लाख १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळ्यात अडकले. याप्रकरणी तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण व खासगी व्यक्ती सलीम करीम शेख या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती उपअधीक्षस संगीता पाटील व पैठणचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी दिली. सलीम करीम शेख (रा. लक्ष्मीनगर ता. पैठण), महसूल सहायक (वर्ग-३) हरीश शिंदे व तहसीलदार सारंग चव्हाण, अशी लाच मागितल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी वाळू वाहतुकी वाहने पकडली होती. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडे वर्ग करण्यात आले. पैठणच्या महसूल विभागात तक्रारदार वाहने सोडवून आणण्यासाठी गेले असता तेथे महसूल सहायक हरीश शिंदे याने चलनासाठी ५० हजारांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने २० हजार रुपये दिले. काही दिवसांनी तक्रारदार तहसील कार्यालयात गेला तेव्हा तहसीलदारांच्या कक्षाबाहेर बसलेला सलीम शेख याने तक्रारदाराला सारंग चव्हाण यांची आेळख करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे नेले. प्रकरणावर चर्चा झाली. शेख याने तक्रारदाराकडे दोन लाखांची मागणी केली. तडजोडीनंतर १ लाख १० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, एवढी रक्कम नसल्याने तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या पथकाने १८ फेब्रुवारीची पडताळणी करण्यात आली होती. काही संभाषणही पथकाच्या हाती लागले होते. त्यावरून तहसीलदार सारंग चव्हाण, सलीम शेख व हरीश शिंदे यांच्याविरुद्ध १ लाख १० हजारांची लाच मागितल्याचा गुन्हा पैठण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सलीम शेख व तहसीलदार सारंग चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader