पैठण तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना आमदारांच्या ४-५ मागण्या, त्यास भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन, मुख्यमंत्र्यांकडून मात्र केवळ बघू, आराखडय़ावर चर्चा करू एवढेच उत्तर. कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परतल्याने पैठणकरांची घोर निराशा झाली. विवेकानंद शिक्षण संस्था ७० व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या तुषार शिसोदे यांना बळ देण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचा संदेश मात्र देण्यात आला. विवेकानंद शैक्षणिक संस्थेवर शिसोदे यांचे वर्चस्व आहे.
पैठण येथील शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांना टोमणे मारत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निमित्त म्हणून कार्यक्रम घेतल्याचे सांगितले. ज्या सहजपणे ते भारतीय जनता पक्षात आले, तेवढय़ाच सहजपणे मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास येण्याचे कबूल केल्याचे सांगत दानवे यांनी कार्यक्रम निमित्तमात्र असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी आमदार भुमरे यांना चिमटाही घेतला. मात्र, विकासाबाबतच्या त्यांच्या मागण्यांचे समर्थनही केले.
कार्यक्रमात तत्पूर्वी आमदार भुमरे यांनी जायकवाडीचे पाणी, दुष्काळी मदतीमधून वगळला गेलेला कापूस, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, शहरातील ज्ञानेश्वर उद्यानासाठी निधीची मागणी केली. त्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी निधीची मागणी रास्त असल्याचे दानवे यांनी सांगितले. ते म्हणाले की, सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ४०६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी पाच वर्षांत तरी मिळावा अशी तरतूद करण्याची गरज आहे. असे झाल्यास परिसरात धरण उशाला व कोरड घशाला ही म्हण बदलणार नाही. या संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात काही तरतूद करू, असे सांगितले.
आमदारांनी लक्ष वेधलेल्या कापसाच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलेच नाही. ज्ञानेश्वर उद्यानास निधी देण्यास सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या अनुषंगाने माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी आराखडा दिला आहे. त्याबाबत लवकरच चर्चा करू, असे ते म्हणाले. मात्र, कोणत्याही कामासाठी त्यांनी निधीची घोषणा केली नाही. ठोस आश्वासन नसल्याने पैठणकरांची मात्र निराशा झाली.
पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तेथे भाजपच्या नेत्याला बळ देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास भाजपमधील दिग्गजांनी हजेरी लावली. कार्यक्रमास उपस्थित असणारे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, काही सकारात्मक पावले उचलतो, असे सांगितले आहे. अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेत त्याचे प्रतिबिंब पाहावयास मिळावे, एवढीच अपेक्षा आता करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा