पंकजा मुंडे यांच्या कथित वक्तव्यामुळे वादाला नवे वळण; महंत नामदेवशास्त्रींचा आक्रमक पवित्रा

भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष आता पंकजा यांच्या एका कथित ध्वनिसंभाषणातील वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र झाला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शनिवारी सरपंचांनी भगवानगडाच्या पायथ्याशी बैठक घेत या मेळाव्याला परवानगी देण्याची मागणी केली आहे.

बीड आणि नगर जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असलेल्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी या वर्षीच्या दसरा मेळाव्यात राजकीय भाषण करण्यावर बंदी घातली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर गेल्या ११ महिन्यांपासून महंत व मुंडे समर्थकांत संघर्ष सुरू आहे. दसरा मेळावा कृती समितीचे पदाधिकारी २९ सप्टेंबर रोजी महंतांना भेटण्यासाठी गडावर गेले होते. या वेळी गडावर महंतांचे भक्त व मुंडे समर्थकांत वाद होऊन प्रकरण मारामारीपर्यंत गेले. यातून शास्त्रींविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. या पाश्र्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या कथित ध्वनिसंभाषणाची एक फीत शुक्रवारपासून ‘समाज माध्यमां’वर सर्वत्र प्रसारित झाली आहे. या ध्वनिफितीमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली असल्यामुळे आज या संघर्षांला वेगळे वळण लागले आहे.

दरम्यान, याबाबत महंत नामदेव शास्त्री यांनी आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की गोपीनाथगडावर कीर्तन आणि भगवानगडावर राजकारण कशासाठी? गोपीनाथगडाच्या उद्घाटनातच पंकजा यांनीच गोपीनाथगड ‘राजकीय’, तर भगवानगड ‘श्रद्धे’चा असे जाहीर केले होते. गडावर दर्शनासाठी येण्यासाठी कोणालाही प्रतिबंध नाही. मात्र राजकीय भाषण होणार नाही, या भूमिकेचा शास्त्रींनी पुनरुच्चार केला. याबाबत पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्या उपलब्ध झाल्या नाहीत. पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मात्र हे संभाषण मुंडे यांचे नसल्याचे जाहीर केले आहे.

पंकजा समर्थकांची बैठक

शनिवारी दुपारी भगवानगडाच्या पायथ्याशी खरवंडी येथे नगर आणि बीड जिल्ह्य़ातील सरपंचांची बठक झाली. यामध्ये महंतांनी आपली भूमिका मागे घेऊन मेळाव्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे ऊसतोडणी मजूर कामगार, मुकादम संघटनेचे पदाधिकारी, काही राजकीय पदाधिकारी यांनीही बीड शहरात पत्रकार बठक घेऊन या मेळाव्याला परवानगी देण्याची मागणी केली आहे. भगवानगडावरील मेळाव्यास ६२ वर्षांची परंपरा असल्याने तो बंद केल्यास त्याने समाजात चुकीचा संदेश जाईल, असे मत या वेळी व्यक्त केले आहे. दरम्यान, या संघर्षांत धनंजय मुंडे यांनीही उडी घेत गेल्या दोन वर्षांतील सर्व गुन्ह्य़ांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

Story img Loader