परभणी : ज्या मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो त्या मतदारसंघातून कधीकाळी रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या सामान्य कार्यकर्त्यास लोकांनी निवडून दिले होते… धनशक्तीसाठी बहुचर्चित असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या ज्ञानोबा हरी गायकवाड यांनी चार वेळा आमदारकी मिळवली होती ही दंतकथा वाटावी एवढा बदल या मतदारसंघात झाला आहे. विधानसभा निवडणुकीत पैशाचा अमर्यादित वापर आणि थेट मतदानच विकत घेण्याच्या प्रथेला या मतदारसंघात वीस वर्षापूर्वी सुरुवात झाली. सर्वाधिक धनवान कोण हाच या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याचा निकष आता होऊन बसला आहे.
आज राजकारणात फारसे सक्रिय नसलेले ज्ञानोबा हरी गायकवाड हे साध्या राहणीसाठी सर्वपरिचित आहेत. ना महागडी गाडी, ना आलेशान बंगला…कधी पायी तर कधी बसने, रेल्वेने असा त्यांचा प्रवास सुरू असतो. आमदार होते तेव्हाही सर्व स्थानिक शासकीय कार्यालयांमध्ये ते कार्यकर्त्यांसह पायीच जायचे. परभणी जिल्हा हा शिवसेनेआधी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. १९७४ ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा शेकापच्या नेतृत्वाला सुपा या जिल्हा परिषद गटातून उमेदवार हवा होता.१९७२ ला दुष्काळ पडल्यानंतर ज्ञानोबा हरी गायकवाड हे पदवीचे शिक्षण अर्धवट सोडून गावी आले. पुढे काही काळ ग्रामीण भागात दुष्काळाची कामे सुरूच होती. त्यावेळी धनगर मोहा या गावी रोजगार हमी योजनेच्या खडी केंद्रावर मजूर म्हणून काम करणाऱ्या ज्ञानोबा हरी गायकवाड या तरुणास शेकापच्या नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली. त्यात ते निवडून आले. पुढे १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांना गंगाखेड मतदार संघातून शेकापची उमेदवारी मिळाली. अक्षरशः लोकांनीच ही निवडणूक हाती घेतली. कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून अन्नधान्य गोळा झाले. श्री. गायकवाड सांगतात की, ‘मला या निवडणूकीत एक रूपयाचाही खर्च आला नाही पण निवडणूकीत जमा झालेले अन्नधान्यही पुढे तीन-चार महिने पुरले.’ आज वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले श्री. गायकवाड हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत.
हेही वाचा : कोटयधीश नेतेमंडळींचा शेती हाच व्यवसाय!
१९७८ पासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. १९७८, १९८०, १९८५, १९९० अशा सलग चार निवडणुकांमध्ये ज्ञानोबा हरी गायकवाड यांनी विजय संपादन केला होता. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट यांनी अवघ्या पाचशे मतांनी गायकवाड यांचा पराभव केला. घनदाट यांना २९ हजार ६१० तर गायकवाड यांना २९ हजार १३४ मते मिळाली. १९९९ ची निवडणूकही घनदाट यांनी जिंकली. त्यानंतर या मतदारसंघाची सगळीच गणिते बदलली. राखीव असलेला हा मतदारसंघ खुला झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर या मतदारसंघाने धनशक्तीचे विक्रमच मोडून टाकले. राज्यभरातल्या सर्वच माध्यमांतून हा ‘खर्चिक’ मतदारसंघ चर्चेत आला. जिल्ह्यातला सर्वाधिक ‘लक्ष्मीअस्त्र’ चालणारा मतदारसंघ म्हणून गेल्या वीस वर्षात या मतदारसंघाची ओळख मराठवाडाच नव्हे तर मराठवाड्याबाहेरही आता जाऊन पोहोचली आहे.