येथील विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रियांका राजू धुळे या मुलीस काही समाजकंटकांनी परराज्यात विकले किंवा मारून टाकले, असा आरोप करीत ‘माय बाप. पोलीस हो.. माझ्या मुलीचा शोध घ्या हो’ अशी विनवणी फलक हातात घेऊन प्रियांकाच्या आई-वडिलांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यासमोर ७ तास उभे राहून धरणे आंदोलन केले.
सुनीता व राजू जळबा धुळे (समगा, तालुका हिंगोली) या दाम्पत्याने सांगितले, की आपली मुलगी प्रियांका (वय १४) ही येथील विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला १४ जुलैस येथील नाईकनगर परिसरातील राहत्या घरून काही आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. या प्रकरणी १ ऑगस्टला शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रियांकाची परराज्यात विक्री झाली असावी किंवा तिला मारून टाकले असावे, अशी या कुटुंबाची तक्रार आहे.
फिर्यादी सुनीता धुळे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे संशयित आरोपींची नावे दिली. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मुलीच्या शोधासंदर्भात पोलीस ठाण्यात खेटे घातल्यानंतर ‘तपास चालू आहे’ एवढे एकच उत्तर पोलिसांकडून मिळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
धरणे आंदोलनास बसलेल्या या कुटुंबाने दिलेल्या लेखी निवेदनात मुलीचा गुन्हे अन्वेषण विभागामार्फत शोध घ्यावा, अशी मागणी करताना निवेदनात दिलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी करावी. त्यांचे मोबाइल तपासावेत, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी मुलीचा शोध न लावल्यास १४ डिसेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

Story img Loader