सेलू-पाथरी मार्गावरील खेडुळा शिवारात सोमवारी रात्री चार दरोडेखोरांनी सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडितेला पळवण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी महिलेसोबत पाच जणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यापकी तीन जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन दरोडेखोरांना पाथरी पोलिसांनी अटक केली आहे.
खेडुळा शिवारात श्री. चाऊस व पितळे यांचे दोन आखाडे आहेत. हे आखाडे लुटण्यासाठी धारदारशस्त्रासह चार दरोडेखोर सोमवारच्या रात्री आले होते. त्यांनी आखाडय़ावरील सालगडय़ांना शस्त्राने मारहाण केली. सुरुवातीला श्री. पितळे यांच्या आखाडय़ावर दरोडेखोरांनी हल्लाबोल केला. त्यांच्याच बाजूला असलेल्या श्री. चाऊस यांच्या आखाडय़ावर दरोडा टाकला. या दोन्ही आखाडय़ावरील पाच जणांना शस्त्राने मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये अशोक दामोधर पितळे (वय २०) व दामोधर व्यंकाजी पितळे (वय ४५ रा. पाथरी) सय्यद शहाबुद्दीन सय्यद बशीर (वय ६५), शेख अनीस शेख बाबा व रणजित सटवाजी गायकवाड (वय २०)यांचा समावेश आहे. यापकी अशोक पितळे, दामोधर पितळे, सय्यद शाहबुद्दीन या तिघांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एका आखाडय़ावरील सात महिने गरोदर असलेल्या एका महिलेला जबरदस्तीने उचलून शेतात बाजूला नेले व त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पाथरीकडे धाव घेतली. त्या सध्या पाथरीत तळ ठोकून आहेत. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
घटनास्थळावरून शस्त्र व दोरखंडसह काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. ही घटना रात्री घडली तसेच या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे पीडिता व हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना मदत मिळू शकली नाही. या धक्कादायक घटनेनंतर आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पाथरी पोलिसांनी आज सकाळीच पीडितेच्या तक्रारीवरून कलम ४९४, ४९७, ३७६ (ग), ३२४, ३२३ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करुन दरोडेखोरांचा शोध सुरू केला. पाथरी पोलिसांनी संशयित दरोडेखोर सुनील शेषराव िशदे (वय २२), रवि भास्कर पवार (वय २१), अनिल उत्तम पवार (वय १८) यांना अटक केली आहे.
पाथरीत दरोडेखोरांकडून गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार
सोमवारी रात्री चार दरोडेखोरांनी सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली
Written by लोकसत्ता टीम
First published on: 30-12-2015 at 03:25 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathri crime pregnant gang rape attack arrested