छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या ४६ मतदारसंघामध्ये सुमारे ७५ लाख ४९ हजार ६७० महिला मतदार आहेत. यातील २६.३५ टक्के जणींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरपर्यंतचा हप्ता पोहचला आहे. याशिवाय लखपती दीदी, …. योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय असताना सत्ताधारी पक्षांचे या मतपेढीवर लक्ष आहे. मात्र हे पक्ष आता किती महिलांना उमेदवारी देणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मराठवाड्यात रजनी सातव, केशरकाकू क्षीरसागर, डॉ. विमल मुंदडा, अशाताई वाघमारे, गिरिजाबाई जाधव, शकुंतलाबाई जाधव यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. रजनीताई पाटील राज्यसभेत असणाऱ्या एकमेव महिला खासदार आहेत. पंकजा मुंडे आणि प्रज्ञा सातव विधानपरिषद सदस्य आहेत. जिंतूर मेघना बोर्डीकर व नमिता मुंदडा या दोघी विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. सूर्यकांता पाटील आणि फौजिया खान या केंद्रात आणि राज्यात मंत्री होत्या. मात्र, महिलांना उमेदवारी देण्यात सर्वच पक्षांचा हात नेहमीच आखडता राहिला आहे.

आणखी वाचा-मनोज जरांगे यांच्याकडे ८०० जणांचे अर्ज, निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात पुन्हा पक्षांतराच्या हालचाली

२०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपने १६४ जागा लढवताना १७ महिलांना तिकिट दिले. शिवसेना एकत्र असताना आठ आणि कॉंग्रेसने १५ जणींना उमेदवारी दिली होती. महिला मतपेढी बांधली जात असताना महिलांना उमेदवारी किती दिली जाणार हेही पहावे लागेल, असे सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

लाडक्या बहीण योजनेमुळे महिला मतदारांची प्रतिष्ठाच कमी झाली. काही तरी दिल्यानंतर महिलांचे मत बदलते, असे सांगणारी ही योजना आहे. मूळात असे घडत नाही. दीड हजार रुपयांची ही रक्कम म्हणजे मतदान करा, असे सांगण्यासाठी दिलेली एकप्रकारची लालूच आहे. -सूर्यकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

आणखी वाचा-छत्रपती संभाजीनगर: पोलीस उपायुक्तांच्या १७ वर्षीय मुलाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

महिलांना मदत करणाऱ्या अनेक योजना महायुती सरकारने हाती घेतल्या आहेत. लाडक्या बहिणींना मदत मिळाल्याने त्यांची घरातील पत वाढली आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढला असून पुरुष सांगेल त्याला मतदान करू, हे आता चालणार नाही. महिला स्वबुद्धीने मतदान करतील. -विजया रहाटकर, निवडणूक व्यवस्थापन समिती सदस्य, भाजप