अटक करून पोलीस कोठडी न घेता न्यायालयातून जामीन मिळवून देतो, असे सांगून १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या हवालदार जीवन माधवराव गवारे यास अटक करण्यात आली.
लोहगाव येथे जानेवारी महिनादरम्यान लहान मुलांना पोलिओ डोस देण्याच्या कारणावरून अंगणवाडी सेविका विरुद्ध तक्रारदाराचा भाऊ व भावजयी यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून खिल्लारे पती-पत्नीवर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यांना पोलीस कोठडीत न ठेवता न्यायालयातून जामीन मिळवून देण्याकरिता मदतीच्या नावाखाली आरोपी जीवन माधवराव गवारे यांनी तक्रारदाराकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
या प्रकरणात १ फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान दराडे यांच्या हॉटेलमध्ये तडजोडीअंती १२ हजारांची लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली असता लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या पथकाने ३ फेब्रुवारी रोजी दराडेच्या हॉटेलजवळ सापळा रचला. तक्रारदार खिल्लारे यांना आरोपी जीवन गवारे याने पुन्हा लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीला तक्रारदाराचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाचेची मागणी केल्याप्रकरणी तपासाअंती सोमवारी हवालदार गवारे याच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा