दगडफेकीत पोलिसांसह १५ जखमी
गावातून मिरवणूक काढण्यास विरोध झाल्याने दोन गटांत जोरदार वाद व हाणामारी झाली. या वेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. सुमारे अर्धा तास सुरू असलेला हा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षकाने हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. पोलीस निरीक्षक, पोलीस वाहनाचा चालक यांच्यासह १५जण दगडफेकीत जखमी झाले. नांदेडपासून २० किलोमीटर अंतरावरील, अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देगाव कु ऱ्हाडी (तालुका अर्धापूर) येथे मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान हा प्रकार घडला.
गावातील परिस्थिती तणावपूर्ण, परंतु नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. देगाव कु ऱ्हाडी येथे मंगळवारी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. दुपारी ४ वाजता ही मिरवणूक काढण्यात येणार होती. मात्र, गावातील एका गटाने यास विरोध केला. तेथूनच वादास सुरुवात झाली. मिरवणूक काढण्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या वेळी झालेल्या दगडफेकीत अर्धापूरचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांचा कारचालक कांबळे याच्यासह अन्य पोलीसही जखमी झाले. गायकवाड यांनी या वेळी हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. पोलिसांनी पकडसत्र सुरू केल्याने एकच पळापळ झाली.
गावात बंदोबस्तासाठी नांदेडहून अतिरिक्त तुकडय़ा रवाना झाल्या. मिरवणुकीसाठी सुमारे ४००-५०० लोक जमले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा