मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित जमीन आणि इतर काही मागण्यांसाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे रॅली काढून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. या रॅलीला परवानगी नसल्याचं म्हणत त्यांना अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ अहमदनगर पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं. पोलिसांनी अडवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले होते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं कारण पोलिसांनी दिलं होतं. “कुणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, आम्ही आमचं एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालो आहोत. रॅलीसाठी आपण पोलिसांची परवानगी घेतली होती,” अशी प्रतिक्रिया खासदार जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारकडून आमची रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप जलील यांनी केला. शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना अडचणी येणार नाहीत, अशा पद्धतीने रॅली काढत पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे, असं खासदार जलील यांनी सांगितलं. पोलिसांनी अडवल्यानंतर खासदार जलील यांचा पोलिसांशी वाद झाला. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर गोंधळ घातला, त्यामुळे काही वेळ रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशा पद्धतीने नियमांचं पालन करण्याच्या अटीवर काही गाड्यांना मुंबईला जाण्यास परवानगी दिल्याची माहिती पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी एबीपीशी बोलताना दिली.

हेही वाचा – मुंबईत एमआयएमच्या रॅलीला परवानगी नाही, पोलीस आयुक्तांचा आदेश अंतिम – गृहमंत्री वळसे पाटील

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police stopped mim convey at aurangabad ahmednagar border hrc