औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेने नगरसेवकांना व्हीप जारी केला असून ठराव मतदानाने मंजूर होण्यास ७६जणांचा पाठिंबा असल्याचा दावा सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला. दरम्यान, हा ठराव मंजूर व्हावा या साठी पालकमंत्री रामदास कदम यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली आहे. मात्र, या निर्णयावर खासदार चंद्रकांत खैरे नाराज आहेत. यापूर्वीच या विषयावर माझी भूमिका जाहीर केली होती. आता हा विषय पालकमंत्री महोदयांच्या देखरेखीखाली सुरू आहे. तेव्हा यात मी न बोललेलेच बरे, असे ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यातील ‘महोदय’ शब्दातून वक्रोक्ती जाणवत होती.
आयुक्तांवरील अविश्वासानिमित्त पालकमंत्री विरुद्ध खैरे वादात कोणाची सरशी, हे उद्या मतदानानंतर ठरणार आहे. दरम्यान, अविश्वास ठराव मंजूर होईलच असा दावा भाजपचे नगरसेवक करीत असले, तरी आम्ही पक्षाची भूमिका उद्याच सांगू, असे सोमवारी दुपारी पत्रकार बैठकीत अधिकृतपणे सांगण्यात आले.
अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ७१ मतांची गरज असणार आहे. तीनही गटांचे मिळून शिवसेनेचे ४१ सदस्य, भाजपचे २२ सदस्य आणि शहर विकास आघाडीचे १३ सदस्य अविश्वासाच्या बाजूने मतदान करतील आणि त्यांनी ते तसेच करावे या साठी व्हीप बजावण्यात आला आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख दानवे यांनी दुपारी महापालिकेत बैठक घेऊन व्हीप बजावला. दुसरीकडे एमआयएमने केवळ आयुक्तांनाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. आमदार इम्तियाज जलील म्हणाले की, महापालिका, राज्य सरकार आणि केंद्रातही त्यांचे सरकार आहे. मग अविश्वास आणण्याची वेळ येतेच कशासाठी? त्यांची बदली का करीत नाही? अन्य अधिकाऱ्यांवरही अशीच अविश्वासाची मोहीम हाती घेतली तर एमआयएम त्या बाजूने मतदान करेल. मात्र, फक्त महापालिका आयुक्तांना लक्ष्य केले जात असेल तर त्याच्याविरोधात उभे ठाकावे लागेल. काही अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याने ते सत्तांध असल्याचे सांगत एका राजकीय पक्षातील नेत्याला कर प्रणालीचे कंत्राट द्यायचे होते आणि अन्य एका नेत्याला राकाज्चा वादग्रस्त प्रकल्प ताब्यात घ्यायचा होता. त्यामुळे हे सर्व घडत आहे. आमच्या पक्षानेही व्हीप बजावल्याचे आमदार जलील यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.
सोमवारी दुपारी वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत महापालिका आयुक्तांच्या अविश्वासाचा विषय चर्चेत आल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले. या विषयी शहर जिल्हाध्यक्ष बोलतील असे म्हणत हा विषय भगवान घडामोडे यांच्याकडे टोलवण्यात आला. ते माहिती सांगण्यासाठी सरसावले आणि डॉ. भागवत कराड यांनी त्यांना लगेच रोखले. या विषयी संघटनेकडून आदेश येतील तसे नगरसेवक वागतील एवढेच वाक्य सांगून यापेक्षा अधिक माहिती देण्यास सर्वानीच टाळाटाळ केली. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आयुक्तांच्या विरोधात ठराव आणला जावा, या साठी प्रयत्न केले होते. त्यामुळे उद्या होणाऱ्या महापालिकेतील सर्वसाधारण सभेला वेगळे राजकीय संदर्भ प्राप्त झाले आहेत.

Story img Loader