छत्रपती संभाजीनगर : वालूरची चक्राकार बारव (स्टेपवेल) टपाल तिकिटावर उमटल्यानंतर आता डाक विभागाने बारवांचा वारसा, संवर्धन आणि त्यासंदर्भातील माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी वास्तुशास्त्रीय आरेखन पूर्ण झालेल्या राज्यातील आठ बारवांची नोंद घेतलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे.
राष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून ही माहिती पुस्तिका मुख्य पोस्टमास्टर जनरल (महाराष्ट्र क्षेत्र) के. के. शर्मा आणि पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी बुधवारी प्रकाशित केली आहे. तीत राज्यातील आठ बारवांचा समावेश आहे. त्यातही चार बारव या मराठवाडय़ाच्या परभणी जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती महाराष्ट्र बारव संवर्धन मोहिमेचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर या बारवांची माहिती पुस्तिकेत नोंद आहे, तर अन्य चार बारवांत अमरावतीतील महिमापूर, साताऱ्यातील बाजीराव विहीर, पुण्यातील मंचर आणि नाशिकमधील गिरनारे येथील बारवचा समावेश आहे.
हेही वाचा >>> “तुमच्यात लाज उरलेली नाही, पण…”, रुग्णालय मृत्यूंप्रकरणी आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी सहकाऱ्यांसह बारव संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. अनेक नामशेष आणि बुजलेल्या बारवांचा शोधही या मोहिमेतून लावण्यात आला आहे. वास्तुशास्त्र आणि जलस्रोताचा वारसा सांगणाऱ्या दोन हजार बारवांच्या संवर्धनाचे काम लोकसहभागातून हाती घेऊन राज्यातील दोन हजार बारवांची अचूक ठिकाणे नकाशावर आणली आहेत.
संकेतस्थळावर तपशील..
राज्यातील दोन हजार बारवांची माहिती ‘इंडियन स्टेपवेल्स’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हेलिकल, एल-झेड आकार, शिविपडी आकार, चौकोनी, आयताकृती आकारातील विविध वास्तू स्वरुपातील या बारव आहेत. परंतु त्यांचे आकार, वापरलेली सामग्री आणि पाण्याची साठवण क्षमता भिन्न असल्याचे सांगण्यात आले.