छत्रपती संभाजीनगर : सीता स्वयंवर, वनवास गमन, श्रीराम-भरत भेट, श्रीराम-सीता व लक्ष्मणाला गंगेतून पैलतीरी नावेमधून नेताना नावाडी केवट.. अशा रामायणातील प्रमुख प्रसंगांना टपाल तिकीटांवर साकारण्यात आले आहे. अशा ११ तिकीटांचा ठेवा विविध वस्तुंचे संग्राहक सुधीर कोर्टीकर यांच्याकडे सापडतो. शहरातील एन-४ भागातील गुरुसाहणी नगर येथील रहिवासी कोर्टीकर यांच्याकडे टपाल तिकीटांचा संग्रह असून, त्यांनी हा आगळ्या-वेगळा छंद मनापासून जपला आहे. याच छंदातून त्यांना आढळून आलेल्या तिकीटांवर रामायणावर आधारित प्रमुख प्रसंग दिसतात.
आज देशभरात श्री रामनवमी साजरी होत असून, या उत्सवाच्या पूर्व संध्येला “लोकसत्ता ऑनलाईनला” कोर्टीकर यांनी त्यांच्याकडील ठेवा उघड करून एकूणच छंदा विषयी आणि टपाल विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या तिकीटांविषयीची माहिती दिली. कोर्टीकर म्हणाले, ” भारतीय समाज मनावर रामायणाचा अद्वितीय प्रभाव आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबर २०१७ रोजी रामायणातील प्रसंगांवर आधारीत ११ टपाल तिकिटांचे अनावरण केले होते. वाराणसीतील तुलसी मानस मंदिरात हा सोहळा पार पडला होता. या तिकिटांवर रामायणातील प्रसंग दर्शवण्यात आले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “सीता स्वयंवर, वनवासात जाण्याआधी श्रीराम-दशरथ संवाद, भरत-श्रीराम भेट, नावाडी केवट श्रीराम-सीता व लक्ष्मणाला गंगेतून पैलतीरी नावेमधून नेताना, जटायू श्रीराम संवाद, शबरीने श्रीरामांच्या हाती आंबट-तुरट चवीची येऊ नये म्हणून स्वतः चाखून बोरं देतानाचा प्रसंग, अशोकवाटिकेत हनुमान-सीता भेट, रामसेतू, हनुमान-द्रोणागिरी पर्वत, रावण वध व त्यानंतर अयोध्येत परतलेले श्रीराम असे रामायणातील प्रसंग टपाल तिकिटांवर दर्शवण्यात आले आहेत.”
छंदाबाबत कोर्टीकर म्हणाले, शालेय जीवनात इयत्ता पाचवीत असताना (१९६५ साली) टपाल तिकिटे, जुने नाणे व नोटांचा संग्रह करण्याचा छंद जडला. तेव्हापासून आतापर्यंत मी हा छंद जोपासत आहेत. रामायणावर आधारीत टपाल तिकिटांचे अनावरण होताच ती तिकिटे खरेदी केली होती, अशी आठवण कोर्टीकर यांनी सांगितली.
कोर्टीकर यांच्याकडे विविध देशांतील टपाल तिकिटे पाहण्यासाठी तरुणांचा ओघ लागलेला असतो. त्यावेळी रामायणावर आधारीत ही टपाल तिकिटे दिसताच तरुणाई रामायणात रमते, असे कोर्टीकर यांनी सांगितले.