‘‘देशाला महासत्ता बनविण्याचे दिवास्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्येकाला मानवता धर्माप्रमाणे वागणूक देऊन समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, तरच खऱ्या अर्थाने पुरोगामी प्रगत विचारांच्या महापुरुषांना खरेखुरे अभिवादन ठरेल,’’ असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्सव समारंभात ते बोलत होते. विधी आयोगाचे माजी सदस्य प्रा. डी. एन. संदानशिव, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांची या वेळी उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत शाहूमहाराज म्हणाले, की देशाचा ५ हजार वर्षांचा इतिहास मांडण्यात आला आहे. तथापि अठराव्या शतकापर्यंत देशाचा सामाजिक इतिहास सांगितला गेला नाही. जाती-पातीत, धर्मात व रुढी परंपरेत जखडलेल्या भारतीयांवर इंग्रजांनी अवघ्या एक लाख सन्यासह दीडशे वर्ष राज्य केले. फुले-शाहू-डॉ.आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तन करून मानवता धर्म स्थापन केला. राजर्षी शाहूमहाराज यांनी माणगाव परिषदेत पहिल्यांदा बाबासाहेब हेच दलिताचे उद्धारक, राष्ट्रीय नेते होतील हे जाहीर केले होते. बाबासाहेबांनी शाहूमहाराजांचे हे भाकीत खरे करून दाखविले, असेही ते म्हणाले.
‘सयाजीरावांची कर्तबगारी दुर्लक्षित’
आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा पहिला राजा म्हणून सयाजीराव गायकवाड यांची नोंद आहे. तत्कालीन परिस्थितीत सर्व प्रकारच्या विद्वान, लेखक, विचारवंतांना आíथक मदत देणाऱ्या या राजाचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आला, असे भांड म्हणाले. शिक्षण, साहित्य, सामाजिक सुधारणा करून सयाजीरावांनी बडोदा संस्थानचा नावलौकिक देशभर मिळवून दिला. इंग्लंडमध्ये बंदिस्त असलेल्या सयाजीरावांच्या फाइल्स उपलब्ध करून आणखी संशोधन, लेखन करणार असल्याचेही भांड म्हणाले.
‘संविधान असेपर्यंतच देश अखंड’
प्रा. संदानशिव यांचे ‘राजर्षी शाहूमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. समता, बंधुता व न्याय ही त्रिसूत्री राज्यघटनेमुळे मिळाली. या वैचारिक मूल्यांची बीजे फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीत आहेत. आज या पुरोगामी विचारधारेबाबत जाणीवपूर्वक ‘मौन’ बाळगले जात असून दुसऱ्या विचारांना ‘मन की बात’मधून मांडले जात आहे. जगाच्या इतिहासात ज्याची नोंद घेण्यात आली, असा सामाजिक लढा डॉ. आंबेडकर यांनी उभारला. संयुक्त राष्ट्रसंघाने बाबासाहेबांची जयंती मोठया प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अभिमानाची बाब आहे. अशा या बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांच्या मताला समान मूल्य मिळवून दिले. नंतरच्या काळात राज्यकत्रेही प्रत्येक व्यक्तीला समान मूल्ये देण्यात अपयशी ठरल्याने गरीब-श्रीमंत दरी वाढली, असेही ते म्हणाले. दरवर्षी ११ ते १४ एप्रिल दरम्यान फुले-आंबेडकर जयंती महोत्सव घेण्यात येईल, असे कुलगुरु डॉ. चोपडे यांनी या वेळी सांगितले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader