नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसते, अशी टीका करून सर्वसामान्य लोकांना विकासाचे स्वप्न दाखवून भाजपने देशात व राज्यात सत्ता मिळवली. शहरांचाच विचार करणाऱ्या सरकारने दुष्काळातही राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. अशा विश्वासघातकी सरकारला देशातील जनताच धडा शिकवेल, असा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिला.
येथील राष्ट्रवादी भवनात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आमदार डावखरे यांच्या उपस्थितीत झाला. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जि.प.चे अध्यक्ष विजयसिंह पंडित, नंदकिशोर मुंदडा, माजी आमदार उषाताई दराडे, पृथ्वीराज साठे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमा िपपळे, युद्धाजित पंडित आदी उपस्थित होते.
समाजात जातीय तेढ निर्माण करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असल्याचा आरोप आमदार डावखरे यांनी केला. विदेश दौऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या मोदींना महाराष्ट्रातील दुष्काळ का दिसला नाही, असा सवालही त्यांनी केला. डिसेंबरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस कृतज्ञता वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी शहरासह सर्व तालुकास्तरावर सायकल रॅली काढावी. जिल्हास्तरीय महिला-पुरुषांच्या खुल्या कबड्डी स्पर्धा घ्याव्यात. यातील दोन विजयी संघांना ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पध्रेत प्रवेश देण्यात येईल, असेही डावखरे यांनी सांगितले. जि.प.चे अध्यक्ष पंडित यांनीही ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मोठय़ा प्रमाणात महागाई वाढवून ठेवल्याचा आरोप करीत बेरोजगारांच्या हाताला काम नाही, सर्वत्र दुष्काळ असला तरी सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका केली. अॅड. शेख शफिक यांनी प्रास्ताविक केले.

Story img Loader