तीन महिने होऊनही करारांची माहिती नाही – पृथ्वीराज चव्हाण
भाजप सरकार ‘मेक इन इंडिया’च्या जाहिरातबाजीतून लोकांची दिशाभूल करीत आहे. दोन हजार ५९४ करार झाल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिने लोटले, तरी या करारांची कोण कोठे गुंतवणूक करणार आहे, या बाबतची माहिती दिली नाही. करार झाले असतील तर माहिती का दडवता, असा सवाल करून लातुरला रेल्वेने पाणीपुरवठा करणे ही भूषणावह बाब नाही. महाराष्ट्रात पाणी नाही, हा संदेश गेला तर राज्यात गुंतवणूक कोण करणार? आयपीएलचे सामने राज्याबाहेर गेल्याने १०० कोटींचे नुकसान झाले. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. चव्हाण यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दुष्काळ निवारण परिषदेचे आयोजन केले होते.
माजी मंत्री अशोक पाटील, पंडितराव दौंड, प्रा. टी. पी. मुंडे, संजय दौंड, तालुकाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, निवडणुकीत परदेशातील काळा पसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या विद्यमान सरकारने १५ पसे तरी दिले का? अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना मराठवाडय़ातील दुष्काळ पाहायलाही वेळ नाही. मुख्यमंत्री फडणवीस राज्यात मेक इन इंडियाअंतर्गत २ हजार ५९४ करार झाल्याचे सांगून जाहिरातबाजी करीत आहेत. या कराराबाबत माहिती मागवून ३ महिने लोटले, तरी सरकार कोणते करार व कोण कोठे गुंतवणूक करणार, याची माहिती देत नाही. करार झाले असतील तर माहिती का लपवता, असा सवाल करून लातुरला रेल्वेने पाणी पुरवणे ही काही भूषणावह बाब नाही. मात्र, याचीही सत्ताधाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात चर्चा केली. महाराष्ट्रात पाणी नाही हा संदेश गेला तर राज्यात गुंतवणूक कोण करणार? आयपीएलचे सामने बाहेर गेल्याने राज्याचे १०० कोटींचे नुकसान झाले. मुंबईचे पाणी दुष्काळी भागात येणार होते काय, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार करून काँग्रेस या साठी संघर्ष करील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष मोदी यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची दाहकता मांडून शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी, खरीप हंगामास मोफत बी-बियाणे, खत द्यावे, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा सरकारी नोकरीत समावेश करावा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी मागण्या केल्या. चव्हाण यांनी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा, धानोरा, राडीतांडा येथील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन श्रमदानही केले.

Story img Loader