औरंगाबाद : देशातील गरज आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन चालविल्या जाणार असलेल्या ४०० ‘वंदे-भारत’ रेल्वेगाडय़ांच्या डब्यांचे साखळी उत्पादन पुढील वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यातील शंभर रेल्वेगाडय़ांच्या १६०० डब्यांच्या बांधणीचे काम लातूर येथील कारखान्यातून केले जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
औरंगाबाद येथील देखभाल दुरुस्ती केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
देशातील २०० रेल्वे स्थानकांचे पुनर्निर्माण करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून त्यातील ४७ रेल्वे स्थानकांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ३२ ठिकाणी प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. येत्या काळात मराठवाडय़ातही रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न होतील. त्याचाच भाग म्हणून लातूर येथील रेल्वे डबे निर्माण कारखान्यात आता बदल केले जात असून तेथून बांधणी केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. पूर्णत: भारतीय बनावटीचे रेल्वे डबे निर्माण करण्याचे कार्य हाती घेताना गेली काही वर्षे अभियंत्यांनी मोठी मेहनत घेतली. १८० किलोमीटर वेगाने जाणाऱ्या रेल्वेत आता पेल्यातील पाणीसुद्धा हलत नाही, हे दृश्य देशातील अनेकांनी पाहिले आहे. आता वंदे भारत रेल्वेमुळे देशाच्या दळणवळण व्यवस्थेत मोठे बदल होतील, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.
हे सारे बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारकाईने केलेल्या नियोजनाचा परिणाम असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या काळात अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण केले जातील आणि मगच नव्या प्रकल्पाला हात घातला जाईल असेही त्यांनी सांगितले. रेल्वेच्या अर्थसंकल्पात आता मोठे बदल झाले असून संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या काळात महाराष्ट्रासाठीची तरतूद ११०० कोटी रुपये असायची, ती आता साडेअकरा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
संपुआ सरकारच्या काळात प्रतिदिन सरासरी सात किलोमीटर लोहमार्ग होत होता, तो आता प्रतिदिन १४ किलोमीटपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात २० किलोमीटर प्रतिदिन रेल्वेमार्ग विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे वैष्णव म्हणाले.
वंदे- भारतच्या एका कोचसाठी साधारणत: आठ ते नऊ कोटी रुपयांचा खर्च लागेल. तंत्रकुशल व्यक्तींनी बनविलेल्या या दोन रेल्वे सध्या रुळावर धावत असून त्यांनी आतापर्यंत १८ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पूर्वी रेल्वे बनविताना तीन ते चार मिलिमीटरचा फरक चालत असे. पण आता तो कमी करून एक मिलिमीटर मायक्रॉनपर्यंत कमी करण्यात आला आहे. विमानात बसल्यानंतर ८० ते ९० डेसिबलपर्यंत आवाज येतो. वंदे- भारत रेल्वेमध्ये तो आवाज केवळ ६० ते ६५ डेसिबल एवढाच आहे. आता नव्याने पंतप्रधानांनी या रेल्वेच्या निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे. हे सारे काम या पुढे मराठवाडय़ातून पुढे नेले जाईल असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
औरंगाबाद, जालन्याचा समावेश
नव्याने बांधण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासात औरंगाबाद व जालना या दोन रेल्वेस्थानकांचा समावेश असेल. त्यांच्या विकासासाठी प्रत्येकी १८० कोटी आणि १६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून औरंगाबादच्या रेल्वे स्थानक विकासाला वेरुळ लेणीतील शिल्पाची पार्श्वभूमी असावी, अशी सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केली असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.