डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डाॅ. फुलचंद भगीरथ सलामपुरे यांच्या पीएच.डी. ला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी कुलपतींकडे प्रकरण पाठवण्यात येईल, असे विद्यापीठातील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता डाॅ. सलामपुरे यांनी पीएच.डी. च्या आधारेच अधिसभा व व्यवस्थापन परिषदेवर वर्णी लावून घेतलेल्या लाभाचा मुद्दा आता पेटणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश गुलाबराव हिवराळे यांनी कुलपती व कुलगुरूंकडे डाॅ. सलामपुरे यांच्या प्रबंधांबाबत तक्रार केली होती. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे नेते आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेले डाॅ. फुलचंद सलामपुरे यांनी २०१३ सालच्या समाजशास्त्र विषयात संशोधनासाठी डाॅ. शिवाजी दौलतराव भागानगरे (अर्थशास्त्र – २०११) यांच्या संशोधन कार्याची नक्कल केली आहे. त्यामुळे डाॅ. सलामपुरे यांची पीएच.डी. रद्द करून संशोधक व मार्गदर्शक प्राचार्य डाॅ. दादासाहेब मोटे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे तक्रारीत म्हटले होते. डाॅ. सलामपुरे यांनी समाजशास्त्र विषयात पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेला शोधप्रबंध हा २०११ या वर्षी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. साठीच्या शोधप्रबंधांची शंभर टक्के नक्कल केली आहे. डाॅ. शिवाजी भागानगरे यांनी प्रा. डाॅ. एन. पी. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला तो शोधप्रबंध आहे. डॉ. सलामपुरे यांनी चोरून त्याची नक्कल केली आहे. हा प्रकार काॅपी राइट ॲक्ट १९९५ चे उल्लंघन असून फसवणुकीच्या गुन्ह्याच्या कलमात मोडणारे आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून प्रा. डाॅ. सलामपुरे यांना लेखी खुलासा करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली होती. तसेच दोन समित्याही गठित करण्यात आल्या होत्या. अखेर डाॅ. सलामपुरे यांची पीएच.डी रद्द करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला कुलगुरू डाॅ. येवले यांनी दुजोरा दिला आहे, तर हे प्रकरण विद्यापीठ कायद्यातील १२८-३ अनुसार पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.