“लोकसत्ता”च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीतील वरिष्ठ प्रतिनिधी बिपीन देशपांडे यांनी वडिलांवर लिहिलेल्या “तात्यायन-एक सिद्धांत” या चरित्र ग्रंथाला पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने देण्यात येणारा २०२५ चा महात्मा ज्योतिराव फुले साहित्य पुरस्कार (चरित्र ग्रंथ गट) जाहीर झाला आहे.
विविध गटातील पुरस्कारांची निवड ही या संदर्भातील समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक तथा उदगीर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे व अन्य सदस्यांच्या विचारातून करण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष समाधान दहिवाळ यांनी दिली.
दरम्यान, पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाच्या वतीने लवकरच दुसरे परिवर्तनवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून, त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, असे समाधान दहिवाळ यांनी कळवले आहे.