डाक सहायक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा सवाल
औरंगाबाद : ‘खूप अभ्यास केला, उपयोग काय झाला,’ हा प्रश्न आहे डाक सहायक परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रतीक्षायादीत नाव असलेल्या प्रवीण बबनराव स्वामी या बेरोजगार तरुणाचा.नोव्हेंबर २०१४ मध्ये बारावी उत्तीर्ण अर्हतेवर डाक सहायक पदाची परीक्षा दिल्यानंतर प्रवीणला ६६ गुण मिळाले. प्रतीक्षायादीत तो दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार होता. दुसऱ्यांदा घेतलेली संगणकीय टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रतीक्षायादीतून रिक्त पदांवर जागा भरल्या जातील, असे त्याला माहितीच्या अधिकारात कळविण्यात आले होते. नंतर एके दिवशी डाक विभागाने परिपत्रक काढले आणि प्रतीक्षायादीतील उमेदवारांना रिक्त पदावर स्थान दिले जाणार नाही, असे जाहीर केले. चार वर्षांपासून नोकरी मिळेल, या आशेवर असणाऱ्या प्रवीणच्या इच्छाआकांक्षा संपल्या आहेत. आता पुन्हा तो अभ्यासाला लागला आहे. मधले प्रतीक्षा कालावधीतील चार वर्षे वाया गेले. ते कोण भरून देणार, हा त्याचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
या पदासाठी पाच हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील बहुतांश प्रतीक्षायादीतील उमेदवारांची अवस्था शोचनीय आहे.
प्रवीण स्वामीचे आई-वडील परभणीतील जिल्ह्य़ातील बोरी येथे शेती करतात. बारावीपर्यंत शकुंतलाताई बोर्डीकर विद्यालयात शिकणाऱ्या प्रवीणला ७५.१७ टक्के गुण मिळाले होते. गावातला हुशार विद्यार्थी असे त्याला शिक्षक म्हणत. त्या जोरावर त्याने डाक सहायकाची परीक्षा दिली. ११ मे २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. नंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये संगणकीय टंकलेखनाची परीक्षा घेण्यात आली. पण डाक विभागाने पात्र उमेदवारांना सोडून भलत्याच उमेदवारांना स्थान दिले. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने पहिला निकाल रद्द केला. मग फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यातही प्रवीण उत्तीर्ण झाला. तो २०१५ पासून बेरोजगार आहे. प्रतीक्षायादीतील उमेदवारांना नोकरी दिली जाईल असे सांगितल्याने मधल्या काळात त्यांनी अभ्यास तसा सोडून दिला. डाक सहायकाच्या २०४ जागा भरायच्या होत्या. त्याचा प्रतीक्षायादीतील क्रमांक दुसरा होता. नोकरी मिळेल या आशेवर त्याने माहिती अधिकारात अर्ज केले. तुम्हाला सामावून घेतले जाईल, असे सांगण्यात आले.. आणि नंतर डाक विभागाने परिपत्रक काढून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना घेता येणार नाही. २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत कर्मचारी निवड आयोगाने थेट भरती केल्याचे सांगत हा निर्णय कळविण्यात आला आणि प्रवीण स्वामी पुन्हा बेरोजगार झाला.
तो म्हणतो, ‘एवढा अभ्यास केला. परीक्षा उत्तीर्ण झालो. पण उपयोग काय झाला?’ आता तो या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. इतर मागास प्रवर्गातून प्रतीक्षायादीतील उमेदवारांचा दोष काय, हा त्याचा प्रश्न सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.