पोलीस हवालदार रफिक शेखची उत्तुंग शिखराला गवसणी
सलग दोन वर्षांंपासून एव्हरेस्टला गवसणी घालण्यासाठी धडपड करणाऱ्या औरंगाबाद पोलीस दलात हवालदार शेख रफिक याने गुरुवारी सकाळी मिशन एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. एव्हरेस्टवर केलेल्या या चढाईमुळे रफिक आता मराठवाडय़ातील पहिला एव्हरेस्टवीर ठरला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे दोन वष्रे रफिकला या मोहिमेतून माघार घ्यावी लागली होती. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात असणाऱ्या रफिकला मोहिमेसाठी उमेश दाशरथी, समीर केळकर, मुनीष शर्मा, विकास लाटे आदी उद्योजकांनी सहकार्य केले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही त्याला प्रोत्साहन देत मदत केली. ही मोहीम पूर्ण करण्यापूर्वी रफिकने हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशिप, क्षितीधार, सेव्हन सिस्टर तसेच सिक्कीममधील काद्रू डोम, उत्तराखंडमधील माऊंट कॅमेट येथे गिर्यारोहणाचा सराव केला.
गेल्या दोन वर्षांंपासून त्यास एव्हरेस्ट सर करायचे होते. पहिल्या वर्षी शेरपांच्या मृत्यूमुळे त्याची मोहीम बारगळली, तर दुसऱ्या वर्षी भूकंपामुळे शिखर सर करता आले नाही. या वेळी ४ एप्रिलला त्याने मोहिमेस सुरुवात केली. हिमालयातील आठ शिखरे पार केल्यानंतर ८ हजार ८४८ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट चढण्याचा ध्यास घेतला. मात्र, या मोहिमेसाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळणे आव्हान होते. स्वभावाने मनमिळावू असणाऱ्या रफिकसाठी मदतीचे अनेक हात पुढे आले. माजी पोलिस अधिकारी भीष्मराज बाम यांनी त्याची मानसिकता ढळू नये, यासाठी प्रयत्न केले. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अनिल गायकवाड यांनीही मदत केली. १९७८पासून माऊंटेन लव्हर असोसिएशन चालविणारे रंजन गर्गे यांनी या मोहिमेसाठी त्याला शारीरिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले.
मराठवाडय़ातून एव्हरेस्ट चढाई करण्याचा पहिला मान रफिक शेख याने मिळविल्याने त्याचा पोलीस दलास अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केली.

रात्री चढाई, सकाळी फत्ते
रफिकने बुधवारी संध्याकाळी एव्हरेस्ट कॅम्पच्या चारवरून निघून पूर्ण रात्रभर चढाई केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता तो एव्हरेस्टच्या सागरमाथ्यावर पोहोचला. पोलीस खात्यात नोकरी करून गिर्यारोहणाचा छंद त्याने जोपासला. अधिकाऱ्यांनी त्याला साथ दिली. सध्या एव्हरेस्ट समिटवरून तो कॅम्प चारकडे येत आहे. गुरुवारची रात्र कॅम्प चारवर घालवून शनिवारी (दि. २१) तो बेस कॅम्पला येईल. त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकेल.

Story img Loader