मनोरंजन परवान्याच्या नावाखाली अवैधरीत्या जुगार चालवणाऱ्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील परशुराम सोशल अँड स्पोर्ट्स क्लबवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त ऐवज जप्त केला. या प्रकरणात ४३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर ३३ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
नायगावला श्रीधर मल्लेवार यांनी परशुराम सोशल अँड स्पोर्ट्स क्लब सुरू केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कॅरम, स्नूकर व कार्डक्लबच्या नावाखाली परवाना मिळवताना नियोजित जागेवर मुंबई जुगार अधिनियम कायद्याचे उल्लंघन होणार नाही, सामाजिक – धार्मिक भावना दुखावणार नाही, क्लबमध्ये कोणतेही आíथक व्यवहार होणार नाहीत, केवळ नोंदणीकृत सभासदांना प्रवेश दिला जाईल, असे शपथपत्र दाखल केले होते. दि. १ ऑगस्टपासून हा क्लब सुरू करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परवाना आहे, त्यामुळे आपली पूर्ण मनमानी चालेल अशा आविर्भवात या क्लबचालकांनी येथे बेटिंग व जुगार खुलेआम सुरू ठेवला होता. तेलंगणा, आंध्र व महाराष्ट्राच्या सीमेवर हा क्लब असल्याने धनदांडग्यांची येथे सतत चांगलीच वर्दळ होती. वातानुकूलित असलेल्या या क्लबमध्ये ४२ टेबलवर जुगार खेळला जात होता. यात काही राजकीय पक्षाचे पुढारी, व्यापारी मोठय़ा संख्येने सहभागी होत होते. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना या जुगाराची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच अनेकजण खिडकी तोडून, तसेच अन्य मार्गाने पसार झाले. तरीही पोलिसांनी ३३ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १० लाख रोकड, महागडय़ा चारचाकी गाडय़ा, मोबाईल असा सुमारे सव्वाकोटीचा ऐवज जप्त केला.
यातील बहुतांश आरोपी निजामाबाद, करीमनगर, जगत्याल, मेचेरियाल जिल्ह्यांतील आहेत. नांदेड शहराच्या सिडको परिसरातील ज्ञानेश्वर श्यामराव गुट्टे, भोकर येथील संतोष मारकवाड, विवेक पवार, श्रीधर मल्लेवार, विनायक महाजन, देवीदास दंडवे, शेख युसूफ शे. मनोद्दीन, शेख अयुब शे. गफूर, धर्माबाद येथील अंकुश भोसले, मनोज मानधनी, नरेंद्र रेड्डी िलगारेड्डी साकलवार यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
धर्माबाद शहरालगत हा क्लब खुलेआम चालत असताना स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परवाना आहे, असे सांगून क्लबचा मालकही रुबाब गाजवत होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात असताना ही कारवाई करणाऱ्या सहायक अधीक्षक पंडित यांनी मात्र कारवाई झाल्याचा दावा केला. काही आरोपी फरारी झाल्याचे मान्य करीत लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे धर्माबाद पोलिसांनी या छाप्याची माहिती माध्यमांना मिळू नये, या साठी खास काळजी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा