सनातनचे संस्थापक जे. बी. आठवले आणि त्यांच्या पत्नीने संमोहनशास्त्राच्या माध्यमातून माझ्या मुलीला जाळ्यात ओढले आहे. माझ्या निरागस मुलीला ब्रेन वॉश करून त्यांनी गुंतवून ठेवले. राज्यातील हजारो निरागस तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने जाळ्यात ओढणाऱ्या सनातनच्या आश्रमांवर छापे टाकावेत, तसेच सनातनचे संस्थापक डॉ. आठवले यांना अटक करावी, अशी याचिका तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील राजेंद्र स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
कॉ. गोिवद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक असलेल्या समीर गायकवाडला अटक झाली. त्यानंतर सनातन संस्था व त्यात काम करणारे साधक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो साधकांच्या माता-पित्यांचा जीव टांगणीला लागला आहे. राजेंद्र स्वामी आपल्या ३ मुली आणि २ मुलांसह सुखाने राहत होते. मोठी मुलगी अभियंता, दुसऱ्या मुलीचे पॉलिटेक्निक झालेले, एक मुलगा एमएस्सी तर दुसरा बारावीत आहे. सुसंस्कृत कुटुंब असलेल्या स्वामी यांची एम. कॉम.च्या पहिल्या वर्षांत शिकणारी मुलगी प्रियांका सनातनच्या संपर्कात आली आणि काहीच न सांगता ३ जुल २००९ रोजी घरातून गायब झाली. मुलगी सनातनच्या आश्रमात गेल्याचे कळाल्यावर वडिलांनी तिला परत आणण्यासाठी जंगजंग पछाडले. सनातन संस्थेच्या विचारांना आपली मुलगी बळी पडल्याचे त्यांनी अनेक नेत्यांना सांगितले. यात माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह संभाजी भिडे, काशीचे शंकराचार्य यांचाही समावेश आहे.
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांची हत्या होण्यापूर्वी २०११मध्ये या संस्थेच्या कामकाजाचे गांभीर्य ओरडून साऱ्या जगाला सांगितले.  मात्र, त्या वेळी कोणीच लक्ष दिले नाही, अशी खंत ते व्यक्त करतात. मुलीवर संमोहनशास्त्र व मानसोपचार करून मात्या-पित्याच्या संमतीविना डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. मुलीच्या शोधात सनातनच्या अनेक आश्रमांत हेलपाटे मारले. सनातनचे संस्थापक संमोहनशास्त्राच्या आधारे निरागस तरुण-तरुणींना फसवून जाळ्यात ओढत आहेत. धर्माचा चुकीचा अर्थ सांगून वाईट कामास प्रवृत्त करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या प्रभावाखाली माझ्या मुलीने माझ्यावर खोटी फिर्याद दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader