अकोला-काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडीखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. हिंगोली तालुक्यातील माळसेलू रेल्वेस्थानक परिसरात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.
सोहन आनंदा भिसे (वय ३, माळसेलू) व रोहन राहुल सावंत (वय ४, पोहरादेवी) अशी या मुलांची नावे आहेत. माळसेलू रेल्वेस्थानक परिसरातील उड्डाणपुलाजवळील पटरीवर ही दोन मुले सकाळी दहाच्या सुमारास खेळण्यासाठी गेली होती. रेल्वे पटरीवर खेळत असताना सकाळी ११ वाजता अकोला-काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडीखाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. जोराची धडक बसून चाकाखाली आल्याने दोघांच्या शरीरांच्या चिंधडय़ा उडाल्या. खेळण्यात मग्न असल्याने रोहन व सोहनला रेल्वे आल्याचे कळले नसावे, असा अंदाज घटनास्थळी लावला जात होता.
या प्रकारानंतर ही रेल्वेगाडी काही वेळ थांबविण्यात येऊन माळसेलू व िहगोली रेल्वेस्थानकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर रेल्वे िहगोलीकडे रवाना झाली. रोहन हा पोहरादेवी येथील रहिवासी असून त्याची आई प्रसूतीसाठी माहेरी माळसेलू येथे आली होती. रोहन व सोहन या चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिरापर्यंत नोंद घेण्याची कार्यवाही सुरू होती.

Story img Loader