रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील विविध रेल्वे प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित बठकीस १४ पकी तब्बल १० खासदारांनी दांडी मारली. उपस्थित ४ खासदारांनी नांदेडचा मध्य रेल्वेत समावेश करा, ही आग्रही मागणी लावून धरली.
पुढच्या महिन्यात रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या निमित्ताने नांदेड विभागातील विविध प्रलंबित विकासकामे, प्रवाशांच्या मागण्या व प्रशासकीय, तांत्रिक समस्यांचा आढावा घेण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी येथे खासदारांची बठक बोलविली होती. अशोक चव्हाण, चंद्रकांत खैरे, राजीव सातव व संजय जाधव या चौघांव्यतिरिक्त अन्य दहा खासदारांनी बठकीकडे पाठ फिरवली. खासदार बी. बी. पाटील, भावना गवळी, संजय धोत्रे, आनंदराव अडसुळ, हरी चव्हाण, नंदकुमार चव्हाण, गणेश गोदाम, विजय दर्डा व राजकुमार धूत यांना बठकीस निमंत्रित केले होते, पण ते बठकीस उपस्थित राहिले नाहीत.
बठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर खासदार चव्हाण म्हणाले की, नांदेडसह मराठवाडय़ातील जनतेसाठी पुणे, नागपूर ही दोन शहरे शैक्षणिक व व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाची आहेत. नांदेड-पुणे एक्सप्रेस आणि नंदीग्राम एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करणे आवश्यक आहे. नांदेड-पुणे एक्सप्रेस आठवडय़ातून ३ दिवस लातूरमाग्रे, तर ४ दिवस मनमाडमाग्रे सोडावी त्याप्रमाणे कोल्हापूर-धनबाद, पूर्णा-पाटणा या एक्सप्रेसला हा निकष लावावा.
मराठवाडय़ातून पुण्याला दररोज ५० ते ६० खासगी आरामबस जातात. तितक्याच पुण्याहून येतात. नांदेड-पुणे एक्सप्रेसला जाणूनबुजून विलंब करणे हे रेल्वे अधिकारी व आरामबसवाल्यांचे षड्यंत्र आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बठकीच्या पाश्र्वभूमीवर विभागीय रेल्वे कार्यालयासमोर शुक्रवारी संघर्ष समितीने धरणे आंदोलन केले. दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा, या मागणीसह केलेल्या आंदोलनात संघर्ष समितीचे बाबुभाई ठक्कर, शंतनू डोईफोडे, हर्षद शहा, प्रकाश कौडगे, प्रकाश मारावार यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. या वेळी उपस्थित खासदारांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडण्याचे आश्वासन दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा