विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनासह वरूणराजाने मराठवाडय़ात इतरत्र कृपावृष्टी केली. अन्यत्र पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४३ टक्केच पाऊस झाल्याने टंचाई स्थिती ‘जैसे थे’ आहे. खरीप हंगामातील ७३७ गावांची नजर पैसेवारी ३०पेक्षा कमी आहे. परिणामी सर्वच टंचाईसदृश गावांमधील स्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
मागील ४ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबादवर यंदाही भीषण दुष्काळाचे सावट आहे. जूनमध्ये मृग नक्षत्रात पडलेल्या दमदार पावसावर परंडा, उमरगा, लोहारा व उस्मानाबाद तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके करपून गेली. ऑगस्टमध्ये दोन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जनावरांना चारा मिळावा व एखादे पीक व्हावे, म्हणून खरिपाची उशिराने पेरणी केली. पंधरा दिवसांत सलग पाच दिवस पाऊस झाल्याने या पिकांना जीवदान मिळाले. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यभर पावसाने हजेरी लावल्याने अन्यत्र कोरडय़ाठाक नद्या, ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले. मात्र, उस्मानाबादेत थेंबभरही पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गासह टंचाईग्रस्त गावांत निराशेचे वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३२७ मिमी, म्हणजे सरासरीच्या केवळ ४३ टक्के पाऊस झाला. मागील पंधरवडय़ात जोरदार पावसाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा सकारात्मक परिणाम होत आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने अनेक लघु, मध्यम व मोठय़ा जलसाठय़ांत अजूनही पाणी नाही.
७३७ गावांची पैसेवारी ३०पेक्षा कमी
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात येणाऱ्या ७३७ गावांची नजर पैसेवारी प्रशासनाने काढली. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या सर्व गावांची नजर पैसेवारी ३०पेक्षाही कमी असल्याचा अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारकडे सादर केला. त्यामुळे या सर्व गावांमध्ये सर्व प्रकारच्या टंचाई उपाययोजना राबविण्यात येऊ शकतात.
पावसाची इतरत्र कृपावृष्टी; उस्मानाबादेत कोरडेठाक!
विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनासह वरूणराजाने मराठवाडय़ात इतरत्र कृपावृष्टी केली.
Written by बबन मिंडे
First published on: 20-09-2015 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in marathwada