Aurangabad Sabha Updates, 01 May : मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांनी औरंगाबादमध्ये मोठी गर्दी केली आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून झालेल्या टीकेला राज ठाकरे आपल्या सभेतील भाषणातून उत्तर देणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणाला लक्ष्य करतात आणि काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
आम्हाला सभा घ्यायची असली की हा शांतता क्षेत्र असल्याचे सांगतात. इथे रात्रीची कुठली शाळा भरते. यांना कुठेही परवानगी मिळते. रस्त्यावर येऊन नमाज पडण्याची परवानगी कोणी दिली?
उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही. सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, स्थानिक पोलीस ठाण्यात विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानगी आहे? संभाजीनगरमध्ये ६०० मशिदी असल्याचे मला काल सांगितले. असे फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर देशभरात आहे. संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत. प्रत्येक वेळा आम्हीच का भोगायचे.
लाऊडस्पीकरचा विषय कधी काढायचा नाही का? लाऊडस्पीकर हा काही नवीन विषय नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे आणि मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावू. महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल घडवायच्या नाहीत. मुस्लिम समाजाने ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे.
राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही नसायचा. शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?
शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही.
रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून. गुरु शिष्याच्या नात्याचा कधी संबंध येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठंही वाचलेलं नाही.
माझ्या आजोबांचं चरित्र आहे 'माझी जीवनगाथा'. त्यावर पान क्रमांक १०१ वर म्हटलं आहे, हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते.
शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होता.
राज ठाकरेचं भाषण आहे, हल्लागुल्ला करा आणि जा असं सुरू आहे. या राजकारण्यांना हेच हवंय. माझी दोन भाषणं काय झाली, सगळे फडफडायला लागलेत. शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा.
महाराष्ट्रातील नेते रोज बरळत आहेत. आज लहान मुलं राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील. हे रोज टेलिव्हिजनवर चालतं हे राजकारण आहे? ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला. समाजवाद, हिंदुत्व, कम्युनिझम हे सगळे विचार महाराष्ट्रातून गेले. सर्वात जास्त समाजसुधारक महाराष्ट्राने दिले. सगळे विचार महाराष्ट्राने दिले. आज महाराष्ट्राची काय स्थिती झालीय? आई बहिणीवर शिव्या दिल्या जात आहे. कोणीच मुद्द्यावर बोलत नाही, गुद्द्यावरच बोललं जातंय.
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आमच्या लोकांच्या अंगात भूतं येतात, पण ज्या दिवशी त्यांच्या अंगात शिवाजी महाराज येथील तेव्हा अख्खं जग पादाक्रांत करू. हा आमचा महाराष्ट्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये झाला आणि औरंगजेब महाराष्ट्रात १६८१ मध्ये आला. तो १७०७ ला महाराष्ट्रात मेला. औरंगजेबाने जी पत्रं पाठवली आहेत त्यात तो कोणाचाही उल्लेख करत नाही, फक्त लिहितो की शिवाजी अजूनही मला येथे छळतो. तो लढणाऱ्या प्रेरणेला शिवाजी म्हणतो. त्याला कळलं होतं की शिवाजी व्यक्ती नाही, तर विचार आहे. हा विचार या भूमीत पसरला तर आपलं खरं नाही हे त्याला माहिती होतं. तसंच झालं. मराठेशाहीने अटकेपार झेंडा फडकावला.
संभाजीनगरचं मूळ नाव खडकी आहे. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक देवगिरीचा किल्ला आणि त्याआधी पैठण. आजचा महाराष्ट्र दिन साजरा करताना आधी महाराष्ट्र समजून घ्यायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले
गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकजण बडबडायला लागले. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तरसभा घेतली. मी दोनच सभा घेतल्या, पण या दोन सभांवर किती बोलतात. ठाण्याच्या सभेनंतर दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. त्यांनी सांगितलं की संभाजीनगरला एक सभा घेऊयात. संभाजीनगर तर महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात माझ्या सभा होणार आहेत. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. त्यामुळे सभांना आडकाठी आणून उपयोग नाही. मी कोठेही सभा घेतली तरी ती पाहिली जाणार आहे. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
सभेच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे आगमन होताच गर्व से कहो हम हिंदू हे च्या घोषणा देण्यात आल्या. राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद््यावरुन विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहेत.