मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. शरद पवार यांच्यासाठी खास काही वेगळे संदर्भ आणले आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची यादीच वाचून दाखवली. तसेच शरद पवार यांनी आपल्याला हवं तेवढंच न वाचता हे सर्व वाचावं असा टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांना नास्तिक म्हटल्याने त्यांना बोचलं असं म्हणत सुप्रिया सुळेंचा संदर्भ दिला. ते रविवारी (१ मे) औरंगाबादमधील सभेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार सांगतात आम्ही दोन समाजात दुही माजवत आहोत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत, त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायची. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग त्यांचे मंदिरांमधील फोटो यायला लागले.”
“सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक”
“सुप्रिया सुळे संसदेत बोलल्या की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचली आहेत. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. प्रबोधनकार ठाकरे हिंदू धर्माची पूजा करणारी व्यक्ती होती. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारी ती व्यक्ती होती. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते.” असं राज ठाकरे म्हणाले.
“सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते”
राज ठाकरे म्हणाले, “मी शरद पवारांसाठी काही संदर्भ आणले आहेत. माझ्या आजोबांचं चरित्र आहे ‘माझी जीवनगाथा’. त्यातलं पान क्रमांक १०१ बघा, हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते. सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांचं एक पुस्तक आहे ‘उठ मराठ्या उठ’. या पुस्तकात हिंदू धर्मियांवरील अत्याचाराची माहिती आहे. शरद पवार यांनी जरूर वाचावं.”
हेही वाचा : Raj Thackeray Aurangabad Sabha Live : शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी – राज ठाकरे
“प्रबोधनमधील प्रबोधन याच्या खंड क्रमांक एकमध्ये प्रतापगडाच्या भवानीवरील संकट हे वाचा, रायगडचे रामण्य वाचा, राष्ट्र सेवा हिंदूचं राजधर्म वाचा. आपल्याला पाहिजे तेवढंच वाचू नये,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पवारांना टोला लगावला.