मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा सुरू असतानाच अजान सुरू झाल्याने काही काळ सभास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना विनंती करत आत्ताच्या आत्ता भोंग्यावर अजान देणाऱ्यांच्या तोंडात बोळा कोंबावा, असं मत व्यक्त केलं. तसेच सरळसरळ मार्गाने समजत नसेल, तर मग त्यानंतर जे होईल ते मला माहिती नाही, असं म्हणत गंभीर इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले, “माझी पोलिसांना नम्र विनंती आहे जर हे सभेच्यावेळी बांग सुरू करणार असतील तर आपण आत्ताच्या आत्ता ताबोडतोब तोंडात बोळा कोंबावा. सरळसरळ मार्गाने समजत नसेल, तर मग त्यानंतर होईल मला माहिती नाही. इथं जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा.”
“पोलिसांना विनंती आहे यांची थोबाडं पहिल्यांदा बंद करा”
“जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय. हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे यांना पुन्हा एकदा दाखवावीच लागेल. म्हणून पोलिसांना विनंती आहे यांची थोबाडं पहिल्यांदा बंद करा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
हेही वाचा : “महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे एकदा दाखवावी लागेल”; राज ठाकरेंचा इशारा
“संपूर्ण देशातील हिंदूंना माझी विनंती आहे की मागचा पुढचा अजिबात विचार करू नका, हे भोंगे उतरलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजे, पण मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवले जातील,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
“शरद पवार नास्तिक आहे म्हटलो तर लागलं, पण सुप्रिया सुळेंनी…”
राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग मंदिरांमधील फोटो यायला लागले.”
“सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक”
“सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्षा आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते.” असं राज ठाकरे म्हणाले.
“सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते”
राज ठाकरे म्हणाले, “मी शरद पवारांसाठी काही संदर्भ आणले आहेत. माझ्या आजोबांचं चरित्र आहे ‘माझी जीवनगाथा’. त्यावर पान क्रमांक १०१ वर म्हटलं आहे, हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते. सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांचं एक पुस्तक आहे ‘उठ मराठ्या उठ’. या पुस्तकात हिंदू धर्मियांवरील अत्याचाराची माहिती आहे. शरद पवार यांनी जरूर वाचावं.”
“प्रबोधनमधील प्रबोधन याच्या खंड क्रमांक एकमध्ये प्रतापगडाच्या भवानीवरील संकट हे वाचा, रायगडचे रामण्य वाचा, राष्ट्र सेवा हिंदूचं राजधर्म वाचा. आपल्याला पाहिजे तेवढंच वाचू नये,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पवारांना टोला लगावला.