परभणी जिल्हय़ातील पाथरी येथील रवि गणेश टेहरे (वय २१) या युवकाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. कोणताही गुन्हा केला नसताना सुवर्णकार टेहरे याने पोलीस टेकुळे व रेल्वे विभागाचे चिंचोणे यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केली. हा प्रकार निंदनीय असून टेहरे कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाखांची मदत मिळावी, या मागणीसाठी मराठवाडा सराफ व सुवर्णकार संघाच्या वतीने सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मराठवाडय़ातून आलेल्या सुवर्णकार फेडरेशन व असोसिएशन महासंघाच्या वतीने गेल्या १ जून रोजी घडलेल्या आत्महत्येच्या प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला. रवि टेहरे याने आत्महत्या करण्यापूर्वी गुन्हे शाखेचे टेकुळे व चिंचोणे या दोघांची नावे चिठ्ठीत लिहून ठेवली होती. त्यानंतर सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढला. परिणामी, दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. हे दोघे उजळ माथ्याने फिरत असल्याचा आरोप करीत टेहरे कुटुंबीयास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलीस विविध प्रकरणांत खोटय़ा व चुकीच्या पद्धतीने सुवर्णकारांना गोवत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. मराठवाडय़ातील बहुतांश सुवर्णकारांनी व्यवसाय बंद ठेवून कायमस्वरूपी संरक्षणाची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली. सुवर्णकारांचे व्यवहार तपासून शस्त्र परवाने द्यावेत, दक्षता समित्या स्थापन कराव्यात व कलम ४११ व ४१२चा दुरुपयोग टाळावा, अशी मागणी करण्यात आल्याचे सुधाकर टाक व गणेश बेद्रे यांनी सांगितले. मोर्चात मोठय़ा प्रमाणात सुवर्णकार सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान दुपारी काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा