काँग्रेस पक्षाने येथे नवा मोंढा मदानावर उभारलेल्या व्यासपीठावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या कल्पनेला वेगळे वळण लागल्यानंतर आता ठाकरे यांचा कार्यक्रम शहरातील मल्टिपर्पज हायस्कूलच्या पटांगणावर घेण्याचे निश्चित झाले आहे.
ठाकरे येत्या रविवारी सकाळी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. भयावह दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र या पाश्र्वभूमीवर शिवसेनेतर्फे सुमारे एक हजार गरजूंना मदतीचे वाटप करण्यात येणार असून, या निमित्ताने ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्यांच्या नांदेड दौऱ्याची, तसेच येथील कार्यक्रमाची अधिकृत घोषणा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व हेमंत पाटील यांनी संयुक्तपणे केली. ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वेगवेगळय़ा जागांचा विचार झाला. मोंढा मदान त्यापकी एक होते. ‘मल्टिपर्पज’च्या पटांगणावरील प्रदर्शन गुरुवारी संपल्यामुळे शिवसेनेने ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी आता ही जागा निश्चित केल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. काँग्रेसने उभारलेल्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम होत असल्यासंबंधीच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही, पण मोंढय़ातील जागेची पाहणी केल्याचे संबंधितांनी मान्य केले.
ठाकरे व पालकमंत्री दिवाकर रावते रविवारी सकाळी येथे येणार असून, दुपारी कार्यक्रम आटोपल्यावर येथून परभणीला जाणार आहेत, असे आमदार चिखलीकर यांनी सांगितले.

Story img Loader