मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर शुक्रवारी १ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या कारखान्यांवर व आस्थापनांवर तत्काळ कारवाई करून येणे असलेल्या रकमेची वसुली करावी, अशी मागणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाच्या माध्यमातून औरंगाबाद येथील विविध आस्थापना माथाडी कामगारांची सेवा घेतात. या माथाडी कामगारांच्या प्रश्नावर मराठवाडा लेबर युनियन नेहमीच कार्यरत राहिली असून, १ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे काढणार आहेत. माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर ही युनियन कायम कार्यरत असून युनियनचे पदाधिकारी सुभाष लोमटे, अॅड. सुभाष गायकवाड व डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार आहे.
विविध आस्थापना व कारखाने यांच्याकडील १३ कोटी ६१लाख ४७ हजार ९५० रुपयांची थकबाकी तत्काळ वसूल करा, भाजी मंडईत माथाडी कायदा लागू करा, काढून टाकलेल्या माथाडी कामगारांना पूर्ववत कामगार घ्या, महागाई भत्ता सुरू करा, वेतनवाढीचे नवीन करार करा, लेव्हीचे चेक माथाडी मंडळाकडे जमा करावेत, थकलेली हमाली-तोलाई तत्काळ वसूल करा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally on collector office of mathadi worker