छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चा (पीईएस) अध्यक्ष मीच असल्याचा दावा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या संस्थेची संभाजीनगरमध्ये १८३ एकर जागा असून, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आदी तंत्र महाविद्यालयासह कला, वाणिज्य आदी महाविद्यालये आहेत. ‘नागसेनवन’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या भागातील पीपल्सच्या ताब्यात असणाऱ्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत या विषयावर आठवले यांनी चर्चा केली. बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू वाल्मीक सरवदे यांची उपस्थिती होती. धर्मादाय आयुक्तांनी तसेच उच्च न्यायालयाने एकदा नव्हे तर दोनदा ‘पीईएस’ संस्थेचा अध्यक्ष मीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. तशी कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह अन्य विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी अध्यक्ष म्हणून आपले मत अंतिम धरावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

हेही वाचा >>> संतोष देशमुख हत्या प्रकरण; नवीन एसआयटी

पीपल्स प्रकरणात आम्हाला कोणताही दबाव, दंगा निर्माण करायचा नाही. कायदेशीर बाबीची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष म्हणून आनंदराज आंबेडकर आणि एस. पी. गायकवाड यांचेही दावे आहेत. त्यामुळे रामदास आठवले यांच्या दाव्याबाबत आनंदराज आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आठवले नेहमीच असे काही तरी बोलत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

‘शासन आदेशाप्रमाणे निर्णय’ मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावले असल्याने गेलो होतो. तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी रामदास आठवले असल्याबाबतचे पत्र आले होते. या अनुषंगाने धर्मादाय संस्थांनी दिलेले आदेश, शासनाकडून आलेल्या सूचना याचा अभ्यास करून या शैक्षणिक संस्थेबाबतचे प्रस्ताव आधी शैक्षणिक परिषद व त्यानंतर व्यवस्थापन परिषदेमध्ये ठेवले जातील. त्यानंतरच शासन आदेशाप्रमाणे निर्णय होतील, असे प्रकुलगुरू वाल्मीक सरवदे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale claim president of people education society in press conference zws