औरंगाबाद : राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे तिसरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. यापूर्वी निरंजन डावखरे, उदय सामंत हे दोन नेते राष्ट्रवादीतून अन्य पक्षात गेले होते. रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी आता हे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. संग्राम कोते पाटील यांचा कार्यकाळ अलीकडेच संपला आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात युवकांची संघटना बांधली. त्यानंतर महेश तपासे, उदय सामंत, उमेश पाटील, निरंजन डावखरे, संग्राम कोते पाटील ही संघटनेचे नेतृत्व करणाऱ्यांची नावे होती. त्यातील उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपच्या नेत्यांशी जवळीक साधली. म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची अलीकडेच निवडही करण्यात आली. निरंजन डावखरे यांनीही भाजपशी जवळीक साधली. ते आमदार झाले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती. ती न मिळाल्यामुळे मोहिते पाटील घराण्याचा सन्मान केला जाईल, असे भाजपने सांगितले होते. त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीत बराच गोंधळ उडाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या तिघांनी युतीतील पक्षांना जवळ केले.