मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजपकडून स्वत:च्या शक्तीविषयी वक्तव्ये होत असली, तरी त्यात चुकीचे काही नाही. कारण दोन्ही पक्षांना आपल्या क्षमतेची चाचपणी करण्याचा आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा करण्याचा अधिकार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, समन्वय झाला नाही तर दोन्ही पक्ष स्वतंत्रही लढू शकतील. सर्वच निवडणुका एकत्रित युती करून लढवाव्यात, असा काही कायमस्वरूपी करार आमच्यात झाला नाही. जायकवाडी जलाशयासंदर्भात समन्यायी पाणीवाटपाची आमची भूमिका आहे. शिवसेनेचे पुढारी नाशिकमध्ये मराठवाडय़ासाठी जायकवाडीत पाणी सोडू नये, या मागणीसाठी मोर्चे काढतात. परंतु मराठवाडय़ातील त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी वरच्या भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आग्रह धरतात.
देशात राहणाऱ्यांना भारत माता की जय असे म्हणावेच लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केले. त्यामध्ये आक्षेपार्ह काही नाही. परंतु काँग्रेसची मंडळी या निमित्ताने अकारण राजकारण करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. विधानसभेत एमआयएमचा एक आमदार भारत माता की जय म्हणण्याविरोधात बोलला तेव्हा काँग्रेससह अन्य आमदारांनी त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. आता भारत माता की जय म्हणावेच लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले तर त्यावर गदारोळ करण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल दानवे यांनी केला.
वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू असली तरी त्या संदर्भात अजून निर्णय झाला नाही, असे सांगून दानवे म्हणाले की, छोटय़ा राज्यास अनुकूल असणारी भूमिका काही मंडळी अवश्य मांडत आहेत. त्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भाची बाजू मांडण्यात येते. मात्र, स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीची भाजपची भूमिका नाही आणि अशा मागणीस आमचा विरोध आहे. जालना शहरातील अंतर्गत पाणी वितरण योजनेच्या श्रेयावरून काही पुढारी दावे-प्रतिदावे करीत असले, तरी या संदर्भात आपले प्रयत्न होते. या अनुषंगाने काढण्यात आलेल्या शासन निर्णयात आपल्या मागणीचा उल्लेख आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा