माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा आरोप
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केवळ मुंबईतील सरकारी बंगल्याचा ताबा घेतला असे नाही, तर भोकरदन या त्यांच्या मूळ गावी बांधलेला आलिशान बंगलाही ‘अल्प उत्पन्न’ गटाच्या सोसायटीच्या जागेत उभारला आहे. या बंगल्यात ऐन दुष्काळात रावसाहेबांनी स्विमिंग पूलही बांधला व ते त्यात टँकरने पाणी ओततात, असा आरोप भोकरदनचे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
केवळ एवढेच नव्हे, तर या बंगल्यास लागून मुलींसाठी खेळण्याचे मैदान म्हणून आरक्षित जागेवर मोरेश्वर शिक्षण संस्थेने बेकायदा इमारतही बांधली. रावसाहेब दानवे हे मोरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आहेत. हे अतिक्रमित बांधकाम तातडीने काढून घ्यावे, अशी नोटीस नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना २०१३ मध्येच दिली होती.
या सर्व आरोपांच्या अनुषंगाने रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधता असताना ते म्हणाले, ‘१९५३ मध्ये पूर आल्यामुळे वस्ती वाहून जाऊ नये म्हणून माजी मंत्री भगवंतराव गाडे, माजी खासदार भाऊसाहेब देशमुख, माजी आमदार भाऊसाहेब गावंडे यांना ही गृहनिर्माण संस्था मंजूर झाली होती. त्या भागात कोणी घर बांधत नव्हते, म्हणून त्यांना कर्ज देखील दिले गेले. पुढे त्यातील काही जणांनी जागा विकली आणि ती आम्ही घेतली.’
कोणतेही वैधानिक पद नसताना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सरकारी बंगल्याचा ताबा मिळवल्याचे वृत्त येताच भोकरदनचे त्यांचे घोळही पुढे आणले जात आहेत. भोकरदन येथील सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात निघाल्यानंतर त्याचे पुनरुज्जीवन करताना तेव्हा आमदार असलेल्या रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या नातेवाइकांना संस्थेत सभासद करून घेतले व जागा मिळवली. गृहनिर्माण संस्थेत नातेवाइकांना स्थान देऊन मिळविलेल्या जागेविषयी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, की ही काही सार्वजनिक विश्वस्त संस्था नाही. गृहनिर्माण संस्थेत मी आणि माझे नातेवाईक सदस्य आहेत. यावरच पुढे बांधकाम झाले. या प्रकरणाचा सहकारी संस्थांच्या कार्यालयात पाठपुरावा करणाऱ्या माजी खासदार भाऊसाहेब देशमुख यांचे निधन झाल्याने उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात त्यावर पुढे काही घडले नाही. या अनुषंगाने जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलेले व दोन वेळा खासदार राहिलेले पुंडलिकराव दानवे यांनी उपोषणही केले होते. ‘घराच्या बांधकामात अतिक्रमण केल्यामुळे मी एकदा उपोषणही केले होते,’ असे ते म्हणाले.
याच बरोबर भोकरदनच्या नगरपालिकेच्या हद्दीमधील सव्‍‌र्हे. क्र. ३९ मध्ये सार्वजनिक उपयोगासाठी खासदार-आमदार निधीतून समाजमंदिर व शादीखाना बांधण्यात आला. ही इमारत प्रदेशाध्यक्षांच्या घराला चिकटून आहे. ती नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले.
ही इमारत प्रदेशाध्यक्ष दानवे स्वत:साठी वापरत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केला.
सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा