औंढा नागनाथ तालुक्यातील रास्तभाव दुकानदाराच्या अनागोंदी कार्यपद्धतीवर लाभार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर तहसीलदार श्याम मदनुरकर यांनी रास्तभाव दुकानाला अचानक भेट देऊन तपासणी केली. या वेळी १० मार्चला उचलण्यात आलेल्या ३४ क्विंटल गहू व १७ क्विंटल धान्याला पाय फुटल्याचे उघडकीस आले.
लाख येथील रास्तभाव दुकानदाराविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी होत्या. रास्तभाव दुकानदार मालाची उचल करूनही लाभार्थ्यांना धान्य वाटप करीत नसल्याची तक्रार तहसीलदार कार्यालयात केली होती. तहसीलदार मदनुरकर यांनी लाख येथील रास्तभाव दुकानाची पाहणी करण्यास गावाला भेट दिली असता दुकान बंद असल्याचे त्यांना आढळून आले. या रास्तभाव दुकानदाराने १० मार्चला ३४ क्विंटल गहू व १७ क्विंटल तांदळाची उचल केली होती. मात्र, ते धान्य गावातील लाभार्थ्यांना वाटप झाले किंवा नाही याची चौकशी ग्रामस्थांकडे केली असता दुकानदाराने धान्य वाटप केले नसल्याचे ग्रामस्थांनी चौकशीला आलेल्या पथकाला दिलेल्या जबाबात नमूद केले. तहसीलदार मदनुरकर यांनी रास्तभाव दुकानात धान्य जमा आहे किंवा नाही, हे दुकान बंद असल्यामुळे खिडकीतून पाहिले असता धान्य नसल्याचे त्यांना आढळून आले.
रास्तभाव दुकानदाराने दुकानाचा फलक दुकानाच्या जागेवर न लावता आपल्या घरासमोर लावल्याचे दिसून आले. त्यामुळे तपासाला आलेल्या पथकाने घराच्या परिसरातही पंचासमक्ष धान्याची पाहणी केली. परंतु तेथेही १० मार्चला उचल केलेले धान्य आढळून आले नाही. त्यामुळे मदनुरकर यांनी दुकानदारास नोटीस बजावली होती. संपूर्ण दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना त्यांनी नोटिशीद्वारे दुकानदाराला दिल्या. आता या रास्तभाव दुकानदाराविरुद्ध काय कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा