छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीची मूल्ये आपोआप अंगात भिनत नसतात, तर ती भिनवावी लागतात. सकस विचारांच्या परंपरेतूनच सुदृढ लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाहीपुढील आव्हाने, धोके दाखवणे हे माध्यमांचे काम आहे. त्या अर्थाने सजग माध्यमांचे अस्तित्व महत्त्वाचेच असून, चांगले प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांची आवश्यकता आहे. त्याला वाचकांनीही पाठबळ द्यायला हवे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. देवगिरी महाविद्यालयात आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘लोकशाही, विचारस्वातंत्र्य व प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानात कुबेर शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर होते. मंचावर प्राचार्य अशोक तेजनकर, ज्येष्ठ विधिज्ञ सुखदेव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>> नांदेड : उमरी, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा

युरोपमध्ये रुजलेली लोकशाही आणि अमेरिका आदी महासत्तेसारख्या देशांमधील माध्यमांचे महत्त्व विशद करून कुबेर म्हणाले, की युरोपमध्ये धर्मसत्तेला आव्हान दिले गेले. तेथून लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. लोकशाहीसाठी विचारांचा प्रचंड मोठा संघर्ष करावा लागतो आणि तोही विचारांच्या पातळीवरच.. ज्या प्रांतामध्ये विचारांची सकस परंपरा नसते, तो प्रांत लोकशाही टिकवण्यामध्ये असमर्थ असतो हे इतिहासातील महत्त्वाचे एक सत्य आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार हा लोकशाहीचा गाभा आहे. लोकशाहीमध्ये नियम पाळण्याची संस्कृती असते. लोकशाहीपुढील धोके दाखवणे हे जसे माध्यमांचे काम आहे, त्या माध्यमांना वाचकांचेही पाठबळ तेवढेच आवश्यक आहे. सत्यकथा, किर्लोस्कर, माणूस ही नियतकालिके वाचकांच्या पाठबळाअभावी बंद पडली. कुबेर म्हणाले, की माध्यमांवरही वाचकांचे नियंत्रण हवे. एक तटस्थ यंत्रणाही हवी. नियमन करणारी यंत्रणा नसेल, तर पत्रकारितेलाही विद्रूपीकरणाचा आणि मनोरंजनीकरणाचा धोका आहे. नागरिकांमध्येही प्रश्न विचारण्याची ऊर्मी, प्रेरणा, जागृती होणे तितकेच महत्त्वाचे असून, त्यातूनच लोकशाही वाचू शकेल, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते. ज्या वेळेला लोकशाहीचा, माध्यमांचा ऱ्हास होतो, अशी नागरिक तक्रार करतात, त्यावेळी नागरिकांनीही हा ऱ्हास थांबवण्यासाठी जे काही लागते ते आपण करतो का, असे प्रश्न स्वत:ला विचारणे अपेक्षित आहे. जे जे मोफत ते ते पौष्टिक, असे तत्त्व जर आज असेल, तर नागरिकांनी हेही लक्षात घेतले पाहिजे, की तुम्हीही (नागरिक) एक उत्पादन आहात. असे लोकशाहीपुढील धोके दाखवणे माध्यमांचे काम असते. व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी कुबेर यांचा परिचय करून दिला.

Story img Loader