पिंपरी – चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.श्रीपाल सबनीस यांनी आकुर्डी येथील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. पंतप्रधानांचा एकेरीत उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या पाकिस्तान भेटीवर अश्लाघ्य वक्तव्य केले. त्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांचा नांदेडमध्ये सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
भाजपाने सबनीस जोपर्यंत पंतप्रधानांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा कोणताही कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. सबनीस हे स्वत राजकीय विश्लेषकही नाहीत. परराष्ट्र धोरणाचा त्यांचा अभ्यासही नाही, असे असताना थेट पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून अश्लाघ्य टीका करण्यामागे केवळ रान उठवणे, एवढाच हेतू असू शकतो, असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढला जात आहे.
मराठवाडय़ातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तु.शं. कुळकर्णी यांनी सबनीस यांच्यावर सडकून टीका करताना त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, िपपरी-चिंचवड येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील पाकिस्तान भेटीबाबत जी बालबुद्धी टीका केली आहे, त्याबद्दल श्रीपाल सबनीसांचा मी जाहीर निषेध करतो. ते कोणी राजकीय विश्लेषक नाहीत. मराठवाडय़ातील या साहित्यिकाने आम्हा मराठवाडय़ातील साहित्यिकांची मान शरमेने खाली घातली आहे. त्यांचे हे वर्तन अक्षम्य आहे म्हणून पुन्हा एकदा निषेध.
प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांनी या विषयावर ‘हळद लागे शिशुपाळा, माळ घातली गोपाळा’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. भाजपाच्या डॉ.शोभा वाघमारे म्हणाल्या, ‘आपल्या देशात लोकशाही आहे, व्यक्तिस्वातंत्र्य आहे, म्हणून त्याचा गरफायदा घेत आपणच आपल्या देशाच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करणारे वक्तव्य करावे, हे निषेधार्ह आहे. पाकिस्तानविषयक मोदी यांच्या भूमिकेचे संपूर्ण जगाने स्वागत केले आहे. त्यांनी घेतलेला निर्णय दूरदृष्टीचा आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने अशा विषयावर प्रतिक्रिया देणे आणि पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणे दुर्दैवी आहे. सबनीसांनी आत्मचिंतन करावं.’
भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.चतन्यबापू देशमुख यांनी प्रा.श्रीपाल सबनीस यांचा तीव्र शब्दात धिक्कार करताना त्यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. साहित्यिकांनी साहित्याबद्दल बोलावे. नरेंद्र मोदी आज देशाच्या पंतप्रधान या संवैधानिक पदावर आहेत. या पदावरील व्यक्तीबाबत बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. गोध्रा प्रकरणी न्यायव्यवस्थेने मोदी यांना निर्दोष ठरवल्यानंतर पुन्हा ते उकरून काढणे म्हणजे राजकारण्यांप्रमाणे एखाद्या समुदायाला कुरवाळण्याचे काम साहित्यिकांकडूनही सुरू झाल्याचे हे द्योतक आहे. सबनीस जोपर्यंत नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा एकही कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात होऊ दिला जाणार नाही, अशी भाजपाची भूमिका असल्याचे त्यांनी जाहीर केले.
ठाले गटाचे मौन
साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘मसाप’तील ठाले गटाने सबनीस यांच्या उमेदवारीची पालखी वाहताना त्यांच्या मतपेढीची वाढ करण्यासाठी मतपत्रिका गोळा करण्याचेही काम केले होते. या गटातील साहित्यिक-असाहित्यिक मतदारांनी मात्र सबनीसांच्या मुक्ताफळावर मौन बाळगले.
सबनीस यांच्या वक्तव्याचा नांदेडमध्ये निषेध
पिंपरी - चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.श्रीपाल सबनीस यांनी आकुर्डी येथील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 03-01-2016 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remonstrate of shripal sabnis in nanded