औरंगाबादसाठी मंजूर अनेक योजना याआधी इतरत्र नेल्या. मात्र, आता किमान सुनील केंद्रेकरांसारखे सक्षम अधिकारी तरी येथे ठेवा, या साठी मुख्यमंत्र्यांपुढे रदबदली करण्याचा निर्धार शहरातील उद्योजकांनी सोमवारी आयोजित बैठकीत केला.
सीएमआयएच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बैठकीत मनपा आयुक्तपदाचा पदभार केंद्रेकरांकडेच ठेवण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. मनपा प्रभारी आयुक्तपदाचा पदभार सांभाळताना केंद्रेकर यांनी गेल्या दोन महिन्यांत शहरात पुढाकार घेऊन केलेली कामे, तसेच महापालिकेची घडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, याकडे लक्ष वेधत केंद्रेकरांना मनपा आयुक्तपदी राहू द्यावे, अशी मागणी सीएमआयएसह अन्य ३२ संघटना-संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे केली.
मराठवाडय़ाचे विभागीय मुख्यालय असलेल्या औरंगाबाद शहराचे उद्योग, पर्यटन, शिक्षण व व्यापाराच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. अशा स्थितीत औरंगाबाद महापालिकेचे प्रभावी नेतृत्व करण्यास सक्षम व दूरदृष्टी असलेली व्यक्तीच आयुक्तपदी असण्याची गरज आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व वितरण, मालमत्ता कर परिणामकारकरीत्या गोळा करणे, शहरातील बेटांचे सुशोभीकरण, अतिक्रमण हटवणे, मनपा कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी प्रभावीपणे हाताळले, असे सीएमआयएचे आशिष गर्दे यांनी बैठकीत सांगितले. औरंगाबादचे औद्योगिक क्षेत्र वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत नागरी सुविधांचा अभाव आहे. डीएमआयसीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तपदी सक्षम अधिकारी असणे आवश्यक असण्याची गरज बजाज ऑटोचे सी. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केली. ए. के. सेनगुप्ता, मसिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे, एनआयपीएचे राम अर्लापल्ले, वीरजा सफाया, क्रेडाईचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, मराठवाडा जनता विकास परिषदेचे शरद अदवंत आदी या बैठकीस उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा