सशस्त्र हल्ला, दंगल घडविणे, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक अशा एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ गुन्ह्यांची जंत्री. प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावलेली, जिल्हा न्यायालयाने महिनाभरापूर्वीच एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली. अशी ‘ओळख’ असलेल्या तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, या प्रवेशाच्या निषेधार्थ दानवे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय िनबाळकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
‘पार्टी विथ डिफरन्स’ असे विशेषण मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. तोच कित्ता प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी निवडणुकीनंतर सुरू ठेवला आहे. पोलिसांच्या दप्तरी माजी नगराध्यक्ष रोचकरी यांच्याविरोधात तब्बल २६ फौजदारी गुन्हे दाखल आहेत. महिनाभरापूर्वीच त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली. एकीकडे कारवाई तर दुसरीकडे सन्मानाने भाजपत प्रवेश यामुळे भाजप जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत खळबळ उडाली.
जालना येथे जाहीर कार्यक्रमात रोचकरी यांना दानवे यांनी भाजपत प्रवेश दिला. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्या प्रवेशाचे छायाचित्र सगळीकडे वेगात फिरू लागले. तुळजापूर शहरात मोठे होर्डिग्ज उभारले गेले. त्यावर जिल्ह्यातील एकाही पदाधिकाऱ्याला स्थान दिले नाही, हे विशेष. त्यामुळे संतप्त झालेल्या िनबाळकर यांनी थेट प्रदेश प्रमुखांवर टीकेची तोफ डागत पदाचा राजीनामा दिला. सोबत पोलीस दप्तरी असलेल्या गुन्ह्यांच्या तपशिलाची चारपानी यादीही पक्षश्रेष्ठींना सादर केली.
रोचकरी यांचे ‘राजकीय कौशल्य’ वाखाणण्याजोगे आहे. पूर्वी ते शेकापचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर समाजवादी पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात झालेल्या वादामुळे शिवसेनेची उमेदवारी त्यांना गमवावी लागली. मधल्या काळात ते राष्ट्रवादीतही कार्यरत होते. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपत प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. प्रत्येक निवडणुकीत ३५ हजारांहून अधिक मतांचा आकडा त्यांनी पदरात पाडून घेतला. रोचकरींचे हे बलस्थान पक्षाला बळकट करण्यासाठी फायद्याचे असल्यामुळेच त्यांना प्रदेशाध्यक्षांनी पक्षात स्थान दिले. मात्र, गत निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या िनबाळकर यांनी घरचा आहेर देऊन दानवेंची चांगलीच कोंडी केली आहे.
‘मुंडेंच्या नेतृत्वाची उणीव’
गुंडागर्दी करणाऱ्याला पक्षात स्थान नाही, असे पक्षाचे ब्रीद आहे, तरीही तब्बल २६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि न्यायालयाने गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब केलेल्या व्यक्तीला पक्षप्रवेश दिलाच कसा? असा संतप्त सवाल िनबाळकर यांनी केला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या छत्रछायेखाली २२ वर्षांहून अधिक काळ पक्षाचे काम केले. आता तसे नेतृत्व दिसत नाही. प्रदेश सरचिटणीस असताना गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो, हे चिंताजनक आहे. गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणण्याचे धाडस आपण केले आहे. चुकीच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार नाही. त्यामुळेच राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया िनबाळकर यांनी दिली.
आपण गुन्हेगार नाहीत – रोचकरी
राजकीय-सामाजिक जीवनात काम करताना हेतूत: आरोप केले जातात. याचा अर्थ आपण गुन्हेगार झालो, असे होत नाही. न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. तसेच प्रशासनाने हद्दपार का करू नये, अशी विचारणा केली. संबंधित यंत्रणेला सविस्तर म्हणणे आपण मांडणार आहोत. त्यामुळे माझ्यावर केले जात असलेले आरोप राजकीय स्पध्रेतून होत असल्याचे रोचकरी यांनी स्पष्ट केले. िनबाळकर हे आपले चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांचे मत पक्षासमोर मांडले. पक्षात आपण नवीन आहोत. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यपद्धतीची आपल्याला माहिती नाही. आपणास मागील निवडणुकीत मिळालेला जनाधार लक्षात घेऊन पक्षहितासाठी दानवेंनी पक्षप्रवेश दिला. आपणाऐवजी अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास पक्षाचेच काम करणार आहे. िनबाळकर यांना काँग्रेस वा राष्ट्रवादीतून कोणी तरी हाताळत असल्याचा टोमणाही रोचकरी यांनी मारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा