छत्रपती संभाजीनगर : शहरापासून जवळ असलेल्या पांढरी पिंपळगाव येथील प्लायऊड तयार करणारी कंपनी आर. के. इंडस्ट्रिजला पहाटे आग लागून सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चंद्रकांत वायजी पटेल व आशा चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची आर. के. इंडस्ट्री ही पांढरी पिंपळगाव येथील गट नं. २९ मधील सुमारे सव्वा दोन एकरमध्ये आहे. या कारखान्याला पहाटे अचानक आग लागली. प्लाय तयार करणाऱ्या कारखान्यातील सर्वच साहित्य लाकडाशी संबंधित असल्याने आग वेगाने पसरली.

पदमपुरा अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यानंतर चिकलठाणा अग्निशमन केंद्राचे उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा होळंबे व लक्ष्मण कोल्हे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. आगीत अंदाजे मालमत्ता नुकसान तीन कोटी रुपयांची तर वाचवण्यात यश आलेली अंदाजे एक कोटींची मालमत्ता आहे. आगीमध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही तसेच आगीचे कारण माहिती मिळाली नाही, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार तासानंतर आग आटोक्यात

पहाटे लागलेली आग सकाळी सातनंतर हळुहळु नियंत्रणात येत गेली. यासाठी छत्रपती केकान, विजय कोथमिरे, सचिन शिंदे, दीपक लव्हाळे, अनिकेत लांडगे, राजू राठोड, लालचंद दुबिले, विलास झरे, जगदीश गायकवाड, गोपीचंद मोरे, वाहन चालक, चंद्रसेन गित्ते, विनोद तुपे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले.

Story img Loader