छत्रपती संभाजीनगर – राज्यातील शासकीय रुग्णालयातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया छत्रपती संभाजीनगरमधील येथील कर्करोग रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात करण्यात आली. ज्या ४५ वर्षीय महिलेची गर्भाशय पिशवी काढण्याची ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्या महिलेला दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती देऊन या प्रक्रियेत रक्ताची अजिबात गरज लागत नसल्याचा दावा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, विभाग प्रमुख डाॅ. अर्चना राठोड यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केला.

चार हातांची (आर्म्स) व्यवस्था असलेल्या रोबोटिक यंत्राच्या माध्यमातून गर्भाशय मुखाचा कर्करोग, अंडाशय व गर्भाशय गाठीचा कर्करोगावरील शस्त्रक्रिया करण्यात येते. लठ्ठ महिलांमध्येही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या रोबोटिकच्या सहाय्याने सहजतेने करतात येतात. त्यासाठी खासगी रुग्णालयात ५ ते ६ लाखांच्या आसपास खर्च तर शासकीय रुग्णालयात जेमतेम एक हजार रुपये खर्च येणार आहे. तो खर्चही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नव्या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता नसून, दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान केंद्रात (एम्स) ५ डाॅक्टर व २ परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले. रोबोटिकच्या माध्यमातून करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही आशियातील पहिल्या रोबोटिक शल्यचिकित्सक पद्मश्री डाॅ. मंजुला अनागानी यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. अर्चना राठोड, डाॅ. नरेंद्र पाटील, डाॅ. कनीझ फातेमा, डाॅ. पल्लवी तिडके यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हा आहे रोबोटिक

नेमकी काय आहे प्रक्रिया

रोबोटिक सर्जिकल सिस्टिम विथ ॲक्सेसरीज ही यंत्रसामुग्री राज्य योजनेंतर्गत मान्यता मिळून स्थापित करण्यात आली आहे. टर्न की प्रोजेक्टअंतर्गत ३२.५ कोटी रुपयांचा निधी राज्य योजनेतून मंजूर करून देण्यात आला होता. या रोबोटिकला चार हात असून, ते हात ३६० अंशांमध्ये फिरू शकतात. त्यामुळे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहज करता येते. त्रिमितिय (थ्री-डी) व्हिज्युअलायझेशन आणि मॅग्नीफिकेशनमुळे अधिक स्पष्टता व अचूकता येते. ५ ते ८ मिमी छिद्रातून ही शस्त्रक्रिया करता येते.

Story img Loader