छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रा मराठवाडय़ात सुरू असून, बीड नंतर गुरुवारी जालना जिल्ह्यात त्यांनी ग्रामीण भागात काही ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील असून, दौऱ्यातील रोड शोच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधून नोकरीविषयक प्रश्नांची मांडणी करण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बीडमधील त्यांच्या दौऱ्यात तरुणाईची संख्या लक्षणीय होती. त्यांच्यासोबत पक्षाचे तरुण आमदार संदीप क्षीरसागरही होते. तरुणांसाठी नोकरीच्या प्रश्नांची मांडणी करून त्यांच्याशी संवाद साधण्याची रचना रोहित पवार यांच्या दौऱ्यात केल्याचे स्पष्ट होत आहे. जालना जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये पवार यांनी मंठा, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांतून भेटीगाठी घेण्यावर भर दिला. रोहित पवार यांना दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुढाऱ्यांना गावबंदीच्या निर्णयाचाही सामना करावा लागत असून, त्यामुळे काही तरुण दबावापोटी यात्रेमध्ये सहभागी होत नसून, तसे जाणवत असल्याचेही दौऱ्यात सहभागी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महिला वर्ग येऊन औक्षण करत असून, त्यांच्यासह शेतकरी प्रश्नांची मांडणीही केली जात आहे.