अंबाजोगाई (जिल्हा बीड) तालुक्यातील रोजगार हमीची २५० कामे निकृष्ट दर्जाची असल्याने त्याच्या चौकशीचे आदेश बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. सुमारे १५० कोटी खर्चाच्या कामाच्या चौकशीसाठी रोजगार हमी योजनेच्या उपायुक्तांसह ४ अधिकाऱ्यांची चौकशी समिती विभागीय आयुक्तांनी नियुक्त केली. कामांची पाहणी त्यांनी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्य़ातील रोहयो कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून तक्रारी वाढल्या आहेत. या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी गायब आहेत, रस्ते दिसत नाहीत असेही निदर्शनास आले. औरंगाबाद जिल्ह्य़ातही फुलंब्री तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्याला नुकतेच निलंबित करण्यात आले. अशीच कारवाई बीड जिल्हाधिकाऱ्यांनीही केली. एकाच तालुक्यातील निकृष्ट कामांची तक्रार आल्यानंतर पालकमंत्री मुंडे यांनी विभागीय चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. हा अहवाल तयार होण्यास अद्याप महिना-दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वत: पालकमंत्र्यांनीच चौकशीचे आदेश दिल्यामुळे प्रशासनानेही कामे खरोखर अस्तित्वात आहेत का, याची तपासणी केली आहे. बऱ्याच ठिकाणी घोळ असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. अजून अहवाल तयार नसल्याने याबाबत अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा