सत्ता येऊन वर्ष लोटले, तरी भाजप महायुतीतील घटक पक्षांना सत्तेचा वाटा मिळत नसल्याने घटक पक्षांच्या नेत्यांनी राजकीय दबाव वाढविण्यासाठी प्रमुख भाजप नेत्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाचा वर्धापनदिन साजरा करीत शक्तिप्रदर्शनाची संधी साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आमदार महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिन साजरा करताना घटक पक्षांच्या नेत्यांना एकत्रित केले. आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे. येत्या ३ ऑक्टोबरला होणाऱ्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
रिपाइं युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी पत्रकार बठकीत महामेळाव्याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती असून, डॉ. आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्षाची स्थापना एन. शिवराज, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी केली होती. या वर्षी पक्ष स्थापनेला ५८ वर्षे पूर्ण होत असल्याने वर्धापनदिनाचा महामेळावा बीडला घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीत झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ३ ऑक्टोबरला शहरातील पंचशीलनगर भागातील सर्कस मदानावर सायंकाळी साडेचार वाजता मुख्य कार्यक्रम होईल. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महायुती घटक पक्ष शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, रासप अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या महामेळाव्याला राज्यभरातून एक लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील, असा दावाही कागदे यांनी केला, तसेच या निमित्ताने जिल्हाभरात टेनिसबॉल क्रिकेट, सामान्यज्ञान स्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आणि शहरातील विविध वस्त्यांमध्ये रांगोळी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा