छत्रपती संभाजीनगर: हिजाब, राष्ट्रीय नोंदणी सूची, नागरिकत्त्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर होणारा विरोध आणि समान नागरी कायद्याची चर्चा देशभर सुरू असताना ध्रुवीकरणाची प्रयोगभूमी ठरू लागलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लीम राष्ट्रीय मंच या रा. स्व. संघाशी संबंधित संघटनेने शहरातील मुस्लीम पत्रकारांशी विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले. तुळशी रोप भेट देत ‘ जन्नत का पौधा’ घरी लावा, असा सल्ला देत राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर यांनी केले.
प्रक्षोभक भाषणे करणारी मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाहीत, असेही त्यांनी कार्यक्रमानंतर ‘ लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले. अलीकडच्या काळात शहरात राजा सिंग आणि सुरेश चव्हाणके आदींची प्रक्षोभक भाषणे झाली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर या दोघांची नावे घेऊन विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही भूमिका मांडली. देशात मुस्लीमांच्या विकासासाठी गेल्या १८ वर्षांपासून ही संघटना काम करीत असून मुस्लीमांमधील बुद्धीजीवी, मौलाना, सामाजिक कार्यकर्ता यांना एकत्र घेऊन शिक्षण, पर्यावरण, महिलांचे प्रश्न या विषयावर विशेष लक्ष दिले जात असल्याचा दावा विराग पाचपोर यांनी केला.
एक राष्ट्र, एक कायदा, एक राष्ट्रध्वज, एक घटना आणि एक राष्ट्रगीत हे मुस्लीम राष्ट्रीय मंचचे ध्येय आहे. गोरक्षा आवश्यक का आहे, हेही मुस्लिमांना आवर्जून समजावून सांगण्यात येत आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मुस्लिमांनी तो निर्णय स्वीकारावा म्हणून सभा घेऊन त्यांची मानसिकता बदलविण्यासाठीही या संस्थेने काम केले होते, असे विराग पाचपोर म्हणाले. मुस्लीम पत्रकारांशी वार्तालाप हा देशातील अशा प्रकारच्या संवादाचा पहिला कार्यक्रम असल्याचेही सांगण्यात आले.