छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील वाखरवाडी आणि खामसवाडी येथे विहिरीच्या कामासाठी अधिकची मजुरी देतो म्हणून अहमदनगर येथील विशाल नावाच्या एजंटने संदीप घुकसे आणि भगवान घुकसे या चुलतभावांसह इतर ११ जणांची धाराशिव जिल्ह्यात विक्री केली. तेरा दिवस दररोज महाटे सहापासून रात्री सात वाजेपर्यंत विहिरीत दगड फोडण्याचे काम करून घेतले. दोन वेळा जेवण आणि रात्री पळून जाऊ नये म्हणून त्यांना जबरदस्तीने दारू पाजून जनावरांप्रमाणे साखळदंडाने बांधून ठेवण्यात येत होते. शेवटी एकाने ठेकेदाराच्या तावडीतून पळून जाऊन पोलिसांचे पथक आणले आणि वाखरवाडी आणि खामसवाडी येथे ठेवलेल्या सर्व ११ जणांची शेवटी सुटका झाली.
याप्रकरणी भूम येथील ठेकेदारासह सात जणांविरुद्ध मानवी तस्करीसह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दिवसाकाठी साडेचारशे रुपये मजुरी देण्याचे आमिष दाखवून एका ठेकेदाराने माणसी दोन हजार रुपये याप्रमाणे ११ जणांची विक्री केली. दि. ३ ते १७ जून असे १४ दिवस दगडफोडीच्या कामाचा अनुभव नसतानाही खामसवाडी येथे पाच आणि वाखरवाडी येथील विहिरीच्या कामासाठी सहा जणांना ठेवण्यात आले. दररोज मरणयातना सोसल्यानंतर विक्री केलेल्या ११ जणांची दोन्ही ठिकाणांहून आता मुक्तता झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कवठा येथील संदीप रामकिसन घुकसे व त्याचा चुलतभाऊ भगवान अशोक घुकसे २ जून रोजी अहमदनगर येथील रेल्वे स्थानकावर कामाच्या शोधात थांबले होते. त्या ठिकाणी विशाल नावाच्या अंदाजे ४० वर्षे वय असलेल्या एजंटने काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर दोघांनाही प्रतिदिवस साडेचारशे रुपयांप्रमाणे काम देतो, असे आमिष दाखविले. दोघेही बंधू तयार झाले. मात्र एजंट विशाल याने अन्य तिघांनाही असेच आमिष दाखवून सोबत घेतले होते. एकूण पाच जणांना रिक्षात बसवून खर्डा येथील टोलनाक्यावर पाठविण्यात आले. तेथून बळजबरीने एका मोटारीमध्ये बसविले. त्यानंतर विशाल नावाच्या एजंटने भूम येथील ठेकेदार कृष्णा काळू शिंदे याच्याकडून प्रतिमाणसी दोन हजार रुपये घेतले. ठेकेदार कृष्णा शिंदे याने तुम्हा सगळय़ांना दोन हजार रुपयांत विकत घेतले असल्याचे सांगून मोटारीत जबरदस्तीने कोंबून खामसवाडी येथे आणले. तिथे पूर्वीच दोघांना डांबून ठेवलेले होते.
दि. १७ जून रोजी पहाटे संदीप याने आपली कशीबशी सुटका करून चालत चालत सकाळी नऊला ढोकी पोलीस ठाणे गाठले. त्याने घरी संपर्क केला आणि दुपारी दीडच्या सुमारास गावाकडील नातेवाईक, वडील, चुलतभाऊ आले. त्यानंतर कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वाखरवाडी आणि खामसवाडी येथून १० जणांची सुटका केली. याप्रकरणी संदीप घुकसे याने दिलेल्या तक्रारीवरून ढोकी पोलीस ठाण्यात एजंट विशालसह भूम येथील ठेकेदार कृष्णा बाळू शिंदे, मैना जाधव, किरण जाधव, रणजीत बळीराम साबळे, कृष्णा शिंदे याची आई आणि संतोष जाधव या सात जणांविरुद्ध मानवी तस्करीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठेकेदाराकडून मोबदलाही नाही
दि. ३ जूनला पहाटे सहाला सर्वाना विहिरीत कामासाठी उतरविले. १० वाजता जेवणासाठी बाहेर काढले. पुन्हा ११ वाजता विहिरीत सोडले आणि संध्याकाळी सातला विहिरीतून बाहेर काढले. रात्री नऊला जेवण्यासाठी घेऊन गेले आणि झोपताना पळून जाऊ नये म्हणून जबरदस्तीने दारू पाजायचे आणि लोखंडी साखळी बांधून त्याला कुलूप लावून ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला बांधले. दररोज हाच दिनक्रम होता. शारीरिक यातनेमुळे काम होत नसल्यास प्लॅस्टिकच्या पाइपने मारहाण आणि शिवीगाळ केली जात. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली जात होती. घरच्या लोकांची आठवण झाली, तर फोनसुद्धा करू दिला जात नव्हता. तरीही दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला ठेकेदाराने दिलेला नाही.